शाहिद पठाण, Tv9 मराठी, प्रतिनिधी, गोंदिया : माझ्या मुलाला जादूटोणा केला. अन् ग्रामपंचायतमधून (Gram Panchayat ) मिळणाऱ्या लाभापासून मला वंचित ठेवले. असा समज धरून ग्रामपंचायत परिचरावर चक्क टाटासुमो (Tata Sumo) चढवण्यात आली. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या दवनीवाडा (Davaniwada) येथे घडली. यशवंत सूरज मेंढे (51, रा. दवनीवाडा) असे मृताचे नाव आहे. तर प्रवीण भय्यालाल नेवारे (38) असे आरोपीचे नाव आहे. जुना वाद उफाळून आल्यानं हे खून प्रकरण घडलं. संशयातून थेट टाटासुमोखालीच चिरडलं.
यशवंत मेंढे दवनीवाडा ग्रामपंचायतमध्ये परिचर म्हणून कार्यरत होते. प्रवीण भय्यालाल नेवारे याचा त्यांच्यासोबत जुना वाद होता. घटनेच्या दिवशी ग्रामपंचायतचे कामकाज आटोपून यशवंत मेंढे घरी जाण्यासाठी ग्रामपंचायतमधून निघाले. ग्रामपंचायतच्या गेटवर प्रवीण नेवारे याने टाटा सुमो त्यांच्या अंगावर चढविली.
यात यशवंत मेंढे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
यशवंत मेंढे यांनी ग्रामपंचायतमधून मिळणाऱ्या लाभापासून मला वंचित ठेवले. माझ्या मुलास जादूटोणा केला. या संशयातून आरोपीने हे कृत्य केल्याची चर्चा आहे.
दवनीवाडा पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. गावातील परिस्थितीला सावरून आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम 307, 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गाडी अंगावर चढवून खून केला. पण, अपघाताचा बनाव करण्यात आला. शेवटी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कबुली जबाब नोंदविला. तपासात आणखी काही गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.