भंडारा : नाशिकमध्ये (Nashik News) 25 वर्षांचा तरुण धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच, आता आणखी एक दुःखद घटना भंडाऱ्यातून (Bhandara Drowned) समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. तलावाच्या पाण्यात नववीत शिकणारा भारत पाठक (Bharat Pathak) या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. ‘लवकर जाऊन येतो’, असं आजीला सांगून भारत घरातून गेला होता. पण तो जिवंत परतलाच नाही. त्याचा मृतदेहच थेट घरी आल्यामुळे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
भारत ओमप्रकाश पाठक हा 15 वर्षांचा मुलगा पवनी तालुक्यातील चकारा या गावात राहायला होता. गावालगत असलेल्या मालगुजारी तलावावर भारत अंघोळीसाठी गेला होता. पण तिथेच त्याचा बुडून मृत्यू झाला होता. चार तास शोध घेतल्यानंतर भारतचा मृतदेह आढळून आला.
भारत हा अड्याळ येथील विवेकानंद विद्याभवन शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. त्याची आई बाहेरगावी गेली होती. भारतच्या आजीने त्याला सकाळी जेवण करायला सांगितलं. पण बाहेर जाऊन लवकर येतो, असं सांगून तो निघून गेला होता. त्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गावालगतच्या मालगुजारी तलावावर भारतची सायकल, कपडे आणि चपला दिसून आल्या. हे कळताच गावातील लोकांनी तलावाजवळ धाव घेतली.
या संपूर्ण प्रकाराची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सौंदड येथील मासेमारांना भारतचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आलं. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर 15 वर्षांच्या भारतचा मृतदेह तलावात आढळून आला. यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय. ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर संपू्र्ण गाव शोकाकूल झाला होता.