Bhandara : सासरहून गावी जायला निघाले, दोघे बाईकस्वार पुरात बुडाले! एक वाचला, दुसरा बेपत्ता

| Updated on: Jul 15, 2022 | 9:50 AM

Bhandara Drowned News : सासुरवाडीहून मध्यप्रदेशातील गावी जात असताना दोन तरुण मोटरसायकवरुन निघाले होते.

Bhandara : सासरहून गावी जायला निघाले, दोघे बाईकस्वार पुरात बुडाले! एक वाचला, दुसरा बेपत्ता
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

भंडारा : महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाने (Bhandara Rain News) दमदार हजेरी लावली आहे. नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तलावं तुडुंब भरली आहेत. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यानं काही गावांचा संपर्कही तुटलाय. अशातच भंडाऱ्यातून (Bhandara Flood) एक मोठी घटना समोर आलीय. दोघे बाईकस्वार पुराच्या पाण्यात बुडाले. यातील एक जण थोडक्यात वाचला आहे. तर दुसऱ्याचा अजूनही कोणताही थांगपत्ता लागू शकलेला नाही. हे दोघेही तरुण बाईकवरुन आपल्या गावी जायला निघाले होते. सासरवाडीला आलेल्या दोघा तरुणांचा बाईकवरुन प्रवास सुरु होता. रात्रीच्या वेळी या दोघाही तरुणांना पुलावरुन पाण्याचा अंदाज आली नाही. पुराच्या पाण्याचा प्रवाह रात्रीच्या अंधारात लक्षात न आल्यानं दोघे तरुण वाहून (Bhandara drowned News) गेले. यातील एक दुचाकीस्वार तरुण पुराच्या पाण्यातून कसाबसा बाहेर आला. पण दुसरा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात घडली.

अंधारामुळे अंदाज चुकला

सासुरवाडीहून मध्यप्रदेशातील गावी जात असताना दोन तरुण मोटरसायकवरुन निघाले होते. पण दुचाकीसह दोघेही वाहून गेल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील नाल्यावर घडली. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दोघा दुचाकीस्वार तरुणांपैकी एक जण बचावला तर दुसरा बेपत्ता आहे.

या घटनेबाबत कळल्यानंतर गोबरवाही पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. अंधारामुळे गुरुवारी शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. आज सकाळीपासून पुन्हा एकदा शोधकार्य सुरु करण्यात आलं. बेपत्ता तरुणाचा शोध घेतला जातोय.

हे सुद्धा वाचा

सासूरवाडीहून परतताना दुर्घटना

सारांश मुन्नालाल सुखदेवे वय 27 वर्ष (रा. खैरलांजी जि. बालाघाट, मध्यप्रदेश) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. तर रवी सेवक टेकाम 31 वर्ष (रा. खैरलांजी जि. बालाघाट) असे बचावलेल्या तरूणाचे नाव आहे. ते दोघे रवीची सासूरवाडी असलेल्या तुमसर तालुक्यातील बाळपूर हमेशा येथे आले होते. रात्री चिखला मार्गे ते मध्यप्रदेशातील खैरलांजीकडे जात होते.

रात्रीच्या सुमारास कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील पुलावरून जात असताना अंधारामुळे पुलावरून पाणी असल्याचे त्यांना दिसले नाही. त्यामुळे दोघेही मोटरसायकलसह पुलावरून पाण्यात पडले. यापैकी रवी टकाम काही वेळात सुखरूप बाहेर आला. तर सारांश सुखदेवे पाण्यात वाहून गेला. रवीने या घटनेची माहिती सासूरवाडीला दिली. त्यांनी ही माहिती तत्काळ गोबरवाही पोलिसांना दिली. यानंतर पोलीस पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्या तरूणाचा शोध सुरू केला आहे.