चंद्रपूर : दोन चिमुकल्या मुलांचा विष देऊन खून करणाऱ्या पित्यानं आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या साखरा या गावात शेतात वडिलाचा मृतदेह सापडला. विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतकाच्या खिश्यात चिठ्ठी सापडली. त्यात आर्थिक विवंचनेतून मुलांची हत्या केल्याचा तसेच आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. वरोरा शहराजवळील बोर्डा (Borda) गावात काल संजय कांबळे (Sanjay Kamble) या व्यक्तीने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा विष पाजून त्यांचा खून केला होता. सुमित (7) आणि मिष्टी (3) अशी मृतक मुलांची नावं आहेत. वरोरा आणि गिरड पोलीस (Girad and Varora Police) प्रकरणाचा पुढील तपास करताहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरालगत बोर्डा या गावामध्ये कांबळे परिवार वास्तव्याला आहे. संजय श्रीराम कांबळे (वय 30) हा शिकवणी वर्ग घेण्याचे काम करत होता. कोरोना काळापासून त्याची मानसिक परिस्थिती ढासळल्याने शिकवणी वर्ग सुद्धा बंद होते. पत्नी कॉलेजमध्ये कंत्राटी तत्वावर काम करते. आज संजय याने आपल्या दोन्ही मुलांची सुमित संजय कांबळे व मिस्टी संजय कांबळे यांची राहत्या घरी विष देऊन हत्या केली.
मुलांची आई घरी आल्यानंतर दार उघडून पाहताच दोन्ही मुले बेडवर पडून होती. मुलांना हलविण्याचा प्रयत्न करताच आईने आरडाओरडा सुरू केला. शेजारच्या मदतीने लगेच दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत दोन्ही मुलाची प्राणज्योत मावळली होती. प्राथमिक अंदाजानुसार विष पाजून व मुलांचा गळा आवळून हत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
आर्थिक विवंचनेतून संजयनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं. कोरोनाकाळात शिकवणी वर्ग ठप्प झाले होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली होती. त्यामुळं त्याची मनस्थिती खराब झाली होती. त्यातून त्यानं हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. पण, निरागस दोन्ही मुलांचा जीव घेतला. त्यांना विष पाजलं. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानंतर सजंयनं दुसरीकडं जाऊन आत्महत्या केली.