चंद्रपूर : चक्क खासदारांच्या (Member of Parliament) घरात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना चंद्रपुरात (Chandrapur Crime) उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटकही (Three People Arrested) केली. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी खासदारांच्या बंगल्याला असलेलं मुख्य कुलूप तोडून घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्यानं त्यांना निराश होऊन परतावं लागलं. दरम्यान, काहीही न मिळाल्यानं निराश झालेल्या चोरांनी बंगल्याच्या आत नासधूस केली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली होती. या घटनेमुळे पोलिसांचा चोरट्यांना धाक उरलाय का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण जर खासदारांच्या घरावर चोरी करण्याची हिंमत चोरटे करत असतील, तर सर्वसामान्यांचं काय? असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
चंद्रपुरात काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी धानोकरांच्या घराची रेकी केली होती. घरात कुणी नाही, हे पाहून चोरी करण्याच्या उद्देशानं त्यांनी डाव साधला. धानोरकरांच्या सूर्यकिरण नावाच्या बंगल्यावर चोरांना मुख्य दरवाजाला लावलेलं कुलूप फोडलं आणि चोरीचा प्रयत्न करण्यासाठी बंगल्याच्या आत चोर घुसले.
सूर्यकिरण बंगल्यातच आधी धानोरकर यांचं कार्यालयही होतं. मात्र आता हे कार्यालय त्यांनी दुसरीकडे शिफ्ट केलेलं. पण राहण्यासाठी म्हणून बाळू धानोरकर हाच बंगला वापर होते. पण ते मुक्कामी नसल्याचं पाहून चोरांनी डाव साधला होता. त्याआधी त्यांनी रेकीही केली होती.
काँग्रेस खासदाराच्या घरात झालेल्या चोरीनंतर पोलिसांनी तातडीनं यंत्रणा कामाला लावली. या चोरीप्रकरणी आतापर्यंत तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांनी आणखी 2 घरफोड्या केल्याचंही आता समोर आलं आहे. शंकर नेवारे, तन्वीर बेग आणि रोहित इमलकर अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत. बंगल्यातील सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये चोरटे कैद झाले होते. चोवीस तासांच्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सुदैवानं हा चोरीचा प्रयत्न फसल्यानं खासदारांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. मात्र बंगल्यातील सामानाची नासधून चोरांनी केली.