चंद्रपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. कारण चंद्रपूर शहरात सातत्याने हत्याच्या घटना समोर येत आहेत. विशेष म्हणजे या हत्येच्या घटनांनी आता तर थेट टोक गाठलं आहे. कारण चंद्रपुरात आज भर दिवसा एका कुख्यात गुंडाची एका हॉटेलमध्ये चार जणांनी मिळून हत्या केली आहे. हाजी सरवर असं मृतक गुंडाच नाव आहे. हाजी सरवर हा कुख्यात गुंड होता. तो विदर्भात कोळसा माफिया म्हणूनही कुप्रसिद्ध होता. तसेच त्याच्यावर खंडणी वसुली, हत्या, सुपारी घेऊन मारपीट करणे, आरोपींना शरण देणे असे अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्यावर तडीपार आणि मोक्काचीदेखील कारवाई झाली होती. गेल्या काही दिवसांपासून तो जेलमधून बाहेर होता. या दरम्यान त्याची आज भर दिवसा चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये हत्या झाली आहे.
चंद्रपूर शहरातील बिनबा गेट भागात असलेल्या हॉटेल शाही दरबारमध्ये ही हत्येची घटना घडली. आपल्या साथीदारांसह जेवणासाठी पोहोचलेल्या कुख्यात गुंड हाजी सरवर याची आज संध्याकाळी 4 वाजता हत्या करण्यात आली. पाच जणांच्या टोळक्याने अचानक हॉटेलमध्ये येत गोळीबार केला. या गोळीबारात हाजी सरवरला दोन गोळ्या लागल्या तर त्याच्या एका साथीदाराला एक गोळी लागली. शिवा असं सरवरच्या जखमी झालेल्या साथीदाराचं नाव आहे. दोन गोळ्या लागल्यानंतर हाजी सरवर हा जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या किचनमध्ये पळाला. पण आरोपींनी त्याच्या जवळ जात त्याच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपींनी हाजी सरवरचा गळा चिरला. यानंतर आरोपी तिथून पळून गेले.
या थरारक घटनेनंतर हॉटेल मालकाने पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेला हाजी सरवर याचे रुग्णालयात नेताना निधन झाले. तर घटनेत शिवा नामक हाजीचा सहकारी जखमी झालाय. दुसरीकडे घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासातच या घटनेतील पाचही आरोपींनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. हाजी सरवर याचे शव जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचताच तिथे त्याच्या समर्थक आणि नातेवाईकांनी एकच गर्दी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले. पाचही आरोपींकडून देशी बनावटीची एकूण 4 शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.
यातील प्रमुख आरोपी असलेला समीर शेख हा 2009 ते 2016 या काळात गुंड हाजी याचा प्रमुख साथीदार होता. मात्र नंतर दोघांची मोक्का अंतर्गत कारागृहात रवानगी झाली. त्यांच्यात पैशावरून आणि अन्य काही कौटुंबिक मुद्द्यांवरुन संघर्ष झाला होता. नुकतंच नागपुरात या दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी एक बैठक झाल्याची देखील माहिती पुढे आली होती. दरम्यान अनेक व्यवहारात आपण आर्थिकदृष्ट्या फसलो, अशी भावना आरोपी समीर शेख याची झाली होती. त्यामुळे त्याने वेळ मिळताच आपल्या दिग्रसच्या तीन, नागपुरातील एक तर घुगुस परिसरातील नकोडा गावातील एका साथीदारासह हाजीला संपविले. या कटात आणखी किती लोक सहभागी आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.