‘नम्र विनंती, आम्हाला गांजाची शेती करु द्या’, चंद्रपुरातील शेतकऱ्याची सरकारकडे विचित्र मागणी, ग्रामसभेने अर्ज स्वीकारला, पण…

| Updated on: Oct 23, 2021 | 7:17 PM

चंद्रपुरच्या एका शेतकऱ्याने सरकारकडे थेट गांज्याची शेती करण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती केली आहे. शेतकऱ्याने ग्रामसभा, तहसीलदारांना याबाबतचा अर्ज देखील दिला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्याच्या या मागणीची चर्चा आहे.

नम्र विनंती, आम्हाला गांजाची शेती करु द्या, चंद्रपुरातील शेतकऱ्याची सरकारकडे विचित्र मागणी, ग्रामसभेने अर्ज स्वीकारला, पण...
संग्रहित छायाचित्र
Follow us on

चंद्रपूर : राज्यासह देश आणि जगावर कोरोनाचं संकट आहे. या संकटामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळलं. पण राज्यात आलेल्या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडंच मोडलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारने या शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय. पण त्यांच्यापर्यंत जोपर्यंत मदत मिळेल तोपर्यंत काय? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावतोय. अशा परिस्थितीत उद्विग्नतेतून चंद्रपुरच्या एका शेतकऱ्याने सरकारकडे थेट गांज्याची शेती करण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती केली आहे. शेतकऱ्याने ग्रामसभा, तहसीलदारांना याबाबतचा अर्ज देखील दिला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्याच्या या मागणीची चर्चा आहे.

शेतकऱ्याचं नेमकं म्हणणं काय?

चंद्रपूर जिल्ह्यातील नूकसानग्रस्त शेतकर्‍याने सरकारला विचित्रच विनवणी केली आहे. आपल्या 2 एकर शेतीत सतत नुकसान होत असल्याने गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी. शेतकऱ्याच्या या मागणीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी साईनाथ फुलमारे यांनी डोंगरगाव ग्रामसभेत यासाठी थेट अर्जच सादर केला आहे. गांजा शेती करु देण्याचा विनंती करणारा अर्ज त्याने शेतीच्या विपरीत परिस्थितीमूळे घेतला आहे.

ग्रामसभेने अर्ज स्वीकारला, पण कायदेशीर बाजू तपासणार

जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन आणि धान शेती सडल्याचा या शेतकऱ्याचा दावा आहे. कुटुंब पालनपोषणासाठी शासनाकडून मदत मिळत नसल्याने गांजा शेतीची परवानगी त्याने मागितली आहे. तहसीलदार-कृषी विभाग आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना त्याने हा विनंती अर्ज पाठविला आहे. ग्रामसभेने या अर्जासंदर्भात अर्ज स्वीकारत कायदेशीर बाजू तपासून प्रकरण निकाली काढू, अशी माहिती दिली आहे.

गांजाच्या शेतीला देशात बंदी

देशात गांजाच्या शेतीला बंदी आहे. अंमली पदार्थ आणि सामाजिक मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर गांजाच्या शेतीला देशात बंदी आहे. पण राज्यास देशात बऱ्याचदा गांजाच्या शेती केल्याच्या बातम्या समोर येतात. गांजा प्रचंड किंमतीत विकला जातो. त्यामुळे आरोपींकडून गांजाच्या तस्करी केली जाते. त्याविरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे एका शेतकऱ्याने तुरीच्या शेतात गांजा लावला होता. हा कारनामा त्याला चांगलाच महागात पडला होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तब्बल 157 किलो गांजा तसेच तब्बल 9 लाख रुपये जप्त केले होते.

आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड

मोठा आर्थिक फायदा व्हावा यासाठी वैजापूरमधील एका शेतकऱ्याने चक्क तुरीच्या शेतात गांजा लावला होता. गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असूनदेखील या शेतकऱ्याने अवैध पद्धतीने गांजाची शेती केली होती. या कारनाम्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. नंतर पोलिसांनी कारवाई करून या शेतकऱ्याकडून तब्बल 157 किलो गांजा पकडला. तसेच 303 गांजाची झाडे हस्तगत करून नऊ लाख रुपयांपेक्षाही जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पैशांच्या हव्यासापोठी गांजा लागवड करणाऱ्या या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

पती-पत्नीच्या नात्याला काळीमा ! लग्नानंतर सलग 15 वर्षे छळलं, आठवेळा गर्भपात, आता थेट तिला विष पाजलं

पोटातील आतड्या घेऊन चालतानाचा व्हिडिओ व्हायरल, ठाण्यात थरार कॅमेऱ्यात कैद