चंद्रपूर : दुर्गापूर येथील निर्घुण हत्याकांडातील 8 संशयीत आरोपीना अटक (Chandrapur Police Arrest) करण्यात आली. आहे. त्यामुळे या हत्याकांड प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता दहा वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) कारमधून पळून जात असताना मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्यात. वर्ध्याकडे (Wardha) स्कॉर्पिओ वाहनाने सर्व आरोपी पळून जात होते. त्यावेळी आरंभा टोल नाका येथे पोलिसांनी आरोपींच्या वाहनाला गाठलं आणि त्यांना अटक केली.
चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व वैमन्यस्यातून थरारक हत्याकांड घडलं होतं. एका टोळीने महेश मेश्राम या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाची हत्या केली होती.
महेश मेश्रामवर पाळत ठेवून मारेकऱ्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. धारदार शस्त्रांनी वार करून भररस्त्यात महेश मेश्रामची हत्या करण्यात आली होती.
धक्कादायक बाब म्हणजे महेश मेश्राम याचे शिर निर्दयपणे धडावेगळे केल्यानं एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळापासून अंदाजे 50 मिटर दूर महेश याचं शिर फेकून मारेकरी पळून गेले होते.
या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या हत्याप्रकरणी चार विशेष शोध पथके गठीत करण्यात आली होती.
या पथकांनी अज्ञात आरोपींची नावं आणि त्यांचा ठावठिकाणा बाबत गोपनिय माहिती प्राप्त करून तांत्रीक तपास केला. यातील संशयीत आरोपी वर्धा जिल्ह्यात स्कॉर्पिओ गाडीने पळून जात असल्याची माहिती मिळाली.
सदर वाहनाचा माग काढून पथकाने या स्कॉर्पिओला आरंभा टोल नाका, जिल्हा वर्धा येथे दोन वाहने आडवे लावून अडविले. त्यानंतर व योग्य ती काळजी घेवून शिताफीने वाहनामधील 8 संशयित आरोपींना अटक केली.
गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांतच 8 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. वरील आरोपी क्रमांक 1 ते 6 यांचा या हत्याकांड प्रकरणा प्रत्यक्ष सहभाग आहे. तर अन्य दोन आरोपींनी स्कॉर्पिओतून इतर आरोपींना पळून जाण्यास मदत केली असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.
याप्रकरणी सध्या दुर्गापूर पोलिसांकडून पुढील तपास केला जातो आहे. भररस्त्यात घडलेल्या या धक्कादायक हत्याकांड प्रकरणानंतर दुर्गापूरमध्ये खळबळ माजली होती. मात्र पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत अवघ्या काही तासांतच हत्येचा छडा लावलाय.