तेजस मोहतुरे, प्रतिनिधी, भंडारा : संजय आणि सपना (नावं बदललेली)हे दाम्पत्य गेल्या दहा वर्षांपासून मोहाडीत राहतात. दोघांचा सुखी संसार सुरू होता. सपनाचं पती संजयसोबत ८ जूनच्या रात्री भांडण झालं. रागाने सपना 9 जूनच्या सकाळी 6 वाजता मध्यप्रदेशातील माहेरी जाण्यासाठी घरून निघाली. मात्र, तिच्याकडं पैसे नसल्यानं ममता राहुलकर हिला पैसे मागितले. ममता मोहाडी पंचायत समितीमध्ये झाडू पोछा लावते. मात्र, पैसे अपुरे असल्यानं ती मोहाडीत परत येत पुन्हा ममताकडं गेली. या संधीचा फायदा उचलत ममतानं सपनाचा विक्री करण्याचा घाट रचला. सपनाला मोहाडी तालुक्यातील पारडी येथील हरी शेंडे याच्यासोबत गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खैरबोडी येथील ललिता दामले या महिलेकडं पाठविलं.
ललिता दामले हिच्याकडे सपना दहा दिवस राहिली. सपनाला जेवणात गुंगीचे औषध मिसळवून तिला घरात डांबून ठेवलं. या काळात ललितानं तिचे फोटो काढून मोबाईलवरून कुणालातरी पाठविले. सपनाचा बनावट आधारकार्ड तयार केला. तिच्या घरी चार-पाच व्यक्ती यायचे. त्यांच्या बोलण्यातून सपनाला पाच ते दहा लाख रुपयांत परराज्यात विक्री करण्याचा सौदा करण्यात येत असल्याचा संशय आला.
19 जूनच्या मध्यरात्री सपनानं संधी साधून पती संजय यांना फोन केला. ती वाईट व्यक्तींच्या कचाट्यात सापडल्याचे कळवलं. पतीने पत्नीचा आवाज ओळखत मोहाडी पोलीस ठाणे गाठले. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मोहाडी पोलिसांनी मोबाईल लोकेशन घेतला. सपनाला डांबून ठेवलेल्या खैरबोडी गावातील घर गाठलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या सपनाची दलालांच्या तावडीतून सही सलामत सुटका केली. पतीच्या सुपूर्द करीत सपनाची होणारी फसगत थांबवली. त्यामुळे सपनाचे उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवलं.
या प्रकरणात मोहाडी पोलिसांनी ममता राहुलकर (वय 40 वर्षे), ललिता दामले (वय 51 वर्षे), लीलाबाई बडवाईक (वय 55 वर्षे) या तीन महिलांसह हरी शेंडे (वय 55 वर्षे) अशा चौघांना अटक केली आहे. महिला आणि मुलींच्या असहायेचा गैरफायदा घेत या रॅकेटनं आणखी काहींची विक्री केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. आता चौघांना अटक करून त्या दृष्टीनं तपास सुरू आहे. मागील काही वर्षात कुणी बेपत्ता आहेत, का? त्यांची या रॅकेटनं विक्री तर केली नाही ना? त्याचाही या प्रकरणाच्या माध्यमातून उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.