अनोखळी व्यक्तींवर लक्ष ठेवा, लिफ्ट बसवण्यासाठी आला, सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला

| Updated on: Jul 25, 2023 | 9:35 PM

लिफ्ट बसवण्याचं काम सुरू असणाऱ्या लेबरपैकी एकाने या सगळ्या गोष्टी हेरल्या. घरातील मंडळी रुग्णालयात जातात हे पाहून त्याने एक दिवस लिफ्ट बसवण्याच्या कामातून सुट्टी घेतली.

अनोखळी व्यक्तींवर लक्ष ठेवा, लिफ्ट बसवण्यासाठी आला, सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला
Follow us on

नागपूर : नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत शक्ती मातानगर येथील अनिल माकडे यांच्या घरी लिफ्ट बसविण्याच काम सुरू होतं. मात्र याच दरम्यान त्यांचा मुलगा आजारी झाल्याने पती-पत्नी दोघांनाही रुग्णालयांमध्ये ये जा करावी लागायची. लिफ्ट बसवण्याचं काम सुरू असणाऱ्या लेबरपैकी एकाने या सगळ्या गोष्टी हेरल्या. घरातील मंडळी रुग्णालयात जातात हे पाहून त्याने एक दिवस लिफ्ट बसवण्याच्या कामातून सुट्टी घेतली. त्याच दिवशी आजारी मुलाला सुद्धा सुट्टी होणार होती. म्हणून दोघेही पती-पत्नी रुग्णालयात होते. त्याचा फायदा घेत आरोपीने त्यांच्या घरातील लॉकर खोलून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि काही कॅश घेऊन रफूचक्कर झाला.

लॉकर उघड असल्याचं दिसलं

जेव्हा पती पत्नी मुलाला घेऊन घरी आले तेव्हा त्यांना लॉकर उघडं असल्याचं दिसलं. त्यांनी घरातील इतर मंडळीकडे चौकशी केली. मात्र त्यांनी आम्ही तिकडे गेलोच नसल्याचे सांगितलं. अनिल यांनी पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी कसून तपास केला. तेव्हा तांत्रिक तपास करत असताना त्यांच्या लक्षात आलं की एक व्यक्ती काही काळासाठी यांच्या घरात आलेला होता.

कामगारांपैकी एक होता

आरोपीचा शोध घेतला असता तो लिफ्ट बसविणाऱ्या कामगारांपैकीच एक होता. पोलिसांनी त्याला अटक करत पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्याने सगळा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी चोरी गेलेला सगळा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवलं. अशी माहिती नंदनवनचे पोलीस निरीक्षक ए. नाईकवाडे यांनी सांगितलं.

संपूर्ण मुद्देमाल जप्त

घरात लिफ्ट बसविण्याच्या कामासाठी आला. घरच्या लोकांची नजर चुकवत त्याने त्याच घरात चोरी करत सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत.

सावध राहून करावे काम

घरात काही काम सुरू असताना त्या लोकांवर आपण विश्वास टाकून जात असतो. मात्र अशा प्रकारच्या घटना या कुठेतरी सगळ्यांनाच एक शिकवण देऊन जाताना दिसतात. त्यामुळे सावध राहूनच आपल्या घरचं काम करावं, हे नक्की.