नागपूर : नागपूर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. बनावट पिस्ता बनविणाऱ्या कंपनीवर धाड टाकत 12 लाख रुपये किमतीचा बनावट पिस्ता आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
नागपूर पोलिसांनी एका व्यक्तीला दुचाकी वाहनावर संशयितरित्या सामान घेऊन जाताना बघितलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याच्याजवळ काही बॅगमध्ये शेंगदाण्याप्रमाणे दिसणारा पिस्ता आढळून आला. मात्र तो पिस्ता रंग लावलेला आणि कटिंग करून बनविला होता.
पोलिसांनी त्याला कुठून आणल्याचा विचारलं तेव्हा त्याने गोळीबार चौकातील एका कंपनीतून हा आणला असून, याची मोठ्या प्रमाणात विक्री मिठाई बनवणाऱ्या कंपन्यांसाठी होते असल्याचं सांगितलं.
पोलिसांनी सापळा रचत बनावट पिस्ता बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकली. त्या ठिकाणी पाहिलं तर शेंगदाणे भिजवून त्याला वाळवले जात होते. वाळलेल्या शेंगदाण्यांना घातक रंग लावून मग मशीनच्या साह्याने पिस्ताप्रमाणे त्याची कटिंग केली जायची.
70 रुपये किलोच्या भावाने मिळणाऱ्या शेंगदाण्याला हे लोक त्याला पिस्ता बनवून 1100 रुपये किलोच्या भावाने विकायचे. पोलिसांनी यावेळी सगळा माल जप्त केला.
पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती दिली. ते अधिकारीही त्या ठिकाणी दाखल झाले आणि हा संपूर्ण पिस्ता बघितल्यानंतर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.
पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये जवळपास 12 लाख रुपये किमतीचा पिस्ता आणि ते बनविण्यासाठी लागणाऱ्या मशीन जप्त करण्यात आल्या. सोबतच दोन आरोपींना सुद्धा पोलिसांनी अटक केली.
पैसे कमवण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आहे. बोगस पिस्ता बनवून तो मार्केटमध्ये विकण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र आता पोलिसांनी यांना बेड्या ठोकल्या आहे.