अमरावती : माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहार कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने हा हल्ला केल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालानंतर काँग्रेस विरुद्ध बच्चू कडू संघर्ष पेटला आहे.
काय आहे प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर गुरुवारी सकाळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत हल्ला केला आणि त्यांच्या घरासमोर पुतळा जाळल्याचा आरोप आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या जल्लोषात काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आईबद्दल अपशब्द काढल्याचा आरोप करत प्रहार कार्यकर्त्यांनी बँकेचे संचालक आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला केला.
जिल्हा बँकेत पराभव झाला, म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांनीच हल्ला करायला लावल्याचा आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला, माझ्यावर हल्ला करुन घर पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचाही गंभीर आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला. हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्याचा पुढील तपास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन करत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल 5 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. या निकालात जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलने बाजी मारली. 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवत बँकेत आपली सत्ता अबाधित ठेवली. मात्र जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सातशे कोटी गुंतवणूक प्रकरणी सव्वातीन कोटी रुपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रचार परिवर्तन पॅनलने सातत्याने केला होता. सहकार पॅनलला 13 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता अजून स्थापन व्हायची आहे. राजकारणात कधीही गुणाकार बेरीज होऊ शकते, असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेतील पुढील राजकारण कसे असेल याचे संकेत दिले. बँकेत पुढच्या काळात गैरव्यवहार होणार नाही, याची आपण पुरेपूर काळजी घेऊ, असे देखील बचू कडू यांनी सांगितले.
बच्चू कडूंच्या पक्षाची जिल्हा परिषदेत एन्ट्री
दरम्यान, अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना धक्का बसला आहे. कारण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पक्षाने जिल्हा परिषदेत एण्ट्री घेतली आहे. अकोट तालुक्यातील कुटासा मतदार संघातून प्रहार पक्षाचे उमेदवार स्फूर्ती निखिल गावंडे यांनी विजय मिळवला आहे. अमोल मिटकरी यांच्या गावातच त्यांच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं. प्रहार पक्षाने अकोला जिल्हा परिषदेत आतापर्यंत एकही जागा जिंकली नव्हती. मात्र आता एक जागा जिंकून प्रहाने एण्ट्री घेतली आहे.
संबंधित बातम्या
अमोल मिटकरींचा गावातच पराभव, बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ची धडाकेबाज एण्ट्री