नागपूर : चोर, गुन्हेगारांच्या हल्ली चोरी करण्याचे मार्ग बदलले आहेत. ते आता ऑनलाईन पद्धतीने किंवा फोनवर कॉल करुन सर्वसामान्यांना लुबाळतात. पोलीस अनेकदा याबाबत आवाहन करत असतात. पण तरीही काहीजण आरोपींच्या जाळ्यात अडकतात. असाच काहिसा प्रकार नागपुरात घडला आहे. नागपुरात काही आरोपींनी एका इंजिनियरला 7 लाखांचा गंडा घातला आहे. या आरोपींनी संबंधित इंजिनियरला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त पैसे मिळवून देण्याचं आमिष दिलं होतं. त्यांनी तसे पैसे मिळवूनही दिले. पण नंतर त्यांनी आरोपीला लाखो रुपयांनी लुबाडलं.
नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे अभियंता मंगेश महातकर यांना एक फोन आला. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा त्याविषयी मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही करतो, असं आरोपींनी फोनवर सांगितलं. यावेळी आरोपींनी मंगेश यांना विविध कारणं देवून बोलण्यात गुंतवलं. अखेर त्यांच्या आमिषाला बळी पडून मंगेश यांनी पैसे गुंतवण्यास तयारी दर्शवली.
आरोपींच्या सांगण्यानुसार मंगेश यांनी पैशांची गुंतवणूक केली. सुरुवातीला मंगेश यांना चांगला फायदा झाला. त्यानंतर आरोपींनी मंगेश यांना व्याजाचं आमिष देत आणखी पैसे गुंतवण्यास सांगितलं. मंगेश त्यांच्या बोलण्यात भावनिक पद्धतीने गुंतत गेले. आरोपींनी मंगेश यांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे टाकण्यास सांगितले. मंगेश यांनी त्यानुसार सर्व खात्यांमध्ये पैसे भरले. मंगेश यांनी जवळपास 7 लाख रुपये आरोपींच्या बँक खात्यांमध्ये भरले. हीच त्यांची खूप मोठी चूक ठरली.
मंगेश यांना काही दिवसांनंतर एका आरोपीचा फोन आला. त्यांनी फोनवर मंगेश यांना गुंतवणुकीत 7 लाख रुपये तोटा झाल्याचं सांगितलं. त्यानंतर आरोपींनी मंगेश यांच्याशी संपर्कच तोडला. मंगेश आरोपींना वारंवार फोन करत होते. पण आरोपी त्यांचा फोन उचलत नव्हते. अखेर आपली फसवणूक झाल्याची जाणीव मंगेश यांना झाली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी मंगेश यांची तक्रार नोंद करुन घेतली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मंगेश यांनी आरोपींच्या ज्या वेगवेगळ्या खात्यात पैसे टाकले ते खाते राजस्थानचे आहेत, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
Mumbai drugs case : आर्यन खानच्या फोनमध्ये आक्षेपार्ह फोटो, कोर्टात NCBचा मोठा दावा
बाईक जाळल्या, हातात तलवारी नाचवणारे सीसीटीव्ही समोर, कल्याणमध्ये गुन्हेगारी शिगेला