चंद्रपूर : महिलांना गंडा घालणारा आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस रोमियोला पोलिसांनी अटक (Police Arrest) केली होती. चंद्रपूरच्या क्राईम ब्रांच (Chandrapur Crime News) पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या तरुणाने बोगस आयडी तयार केला होता. आपण डॉक्टर आहोत, असं भासवायचा. विदर्भात अनेक महिलांना या इसमानं गंडा घातला होता. अखेर फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. सुमीर बोरकर असं बनावट नाव लावणाऱ्या या आरोपीचं खरं नाव सोहम वासनिक (Soham Vasnik) असं असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं. तो मूळचा भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
फेक आयडी तयार करुन आणि डॉक्टर असल्याचं भासवून सोहम वासनिक महिलांची फसवणूक करत होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात त्यांने महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. सोहम वासनिक असं आरोपीचं खरं नाही असल्याचंही पोलिसांच्या चौकशीतून अखेर उघडकीस आलंय. सोहम वासनिक भंडारा जिल्ह्यातील भांगडी येथील रहिवासी आहे.
सुमीत बोरकर या नावाने त्याने फेसबुकवर आपलं फेक अकाऊंट तयार केलं होतं. त्या माध्यमातून तो महिलांशी ओळख करायचा. आपण स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, असं सांगायचा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला इथे कामाला असल्याचं भासवायचं. माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि मला एक मुलगी असल्याचे तो महिलांना सांगून आपल्या जाळ्यात ओढायचा.
आपली कहाणी खरी आहे, असं भासवण्यासाठी त्याने मुलीचा आणि स्वतःचा फेसबुक वर एक फोटोही लावला होता. एका भलत्याच व्यक्तीचा फोटो लावून हा इसम महिलांची फसवणूक करत असे. इतकंच काय तरवैद्यकीय अधिकारी असल्याचंही सांगण्यासाठी त्याने एक बोगस आयडी कार्डही बनवलं होतं. विशेषतः तो मॅट्रीमॉनी संकेतस्थळावर जास्त सक्रिय असायचा.
1 लाख 44 हजार रुपयांची पे स्लीप तो महिलांना पाठवायचा. आपण लग्न करायचं, असं सांगून महिलांचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर त्यांच्या घरी जावून काही अडचणी सांगायचा आणि महिलांकडून पैसे उकळायचा. महिलांनी पैसे दिले नाही तर प्रसंगी चोरी सुद्धा तो करायचा. अखेर क्राईम ब्रांच पोलिसांनी एक विधवा महिलेच्या तक्रारीनंतर या इसमाचा भांडाफोड केलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा भंडाऱ्यातील एका कॉलेजात प्रोफेसर होता. तो चंद्रपुरात एका महिलेच्या घरी गेला होता. ही महिला मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेली असता, या महिलेच्या घरातील 250 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पसार झाला होता. त्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल केली असता हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय. नागपूर, यवतमाळ, भंडाऱ्यातही आरोपीने महिलांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती पोलिसांच्या चौकशातून समोर आलीय. चोरी गेलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलेत.