नागपूर : बिहारच्या भागलपूर पोलिसांना खुलं चॅलेंज देणाऱ्या कुख्यात आरोपीला नागपूर पोलिसांनी हिसका दाखवला. “राखा को पकड कर दिखा दो, राखा वापीस आ राहा है” असं आव्हान त्याने पोलिसांना दिलं होतं. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुख्यात गँगस्टर राखा तनवीरच्या मुसक्या आवळल्या. तो 2017 पासून नागपुरात लपून बसला होता.
काय होता मेसेज
“भागलपूर के एसपी को खुला चॅलेंज, राखा को पकड कर दिखा दो… राखा वापीस आ राहा है… हिसाब-किताब लेने के लिए… राखा तनवीर…” असा मेसेज बिहारच्या भागलपूर पोलिसांना आरोपीने पाठवला होता. त्यामुळे भागलपूर पोलिसात खळबळ उडाली होती.
नागपूर पोलिसांची मोमीनपुराला भेट
हा मेसेज त्यानंतर सगळ्या पोलीस दलात पसरला. नागपूरच्या गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, की भागलपूर येथील काही युवक मोमीनपुरा भागात राहतात आणि शिवणकाम करतात. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन तपास केला असता त्यात मोहमद तानविर आलम, मोहमद मंजूर आलम हे सापडले.
बिहार पोलिसांना चॅलेंज देणारा तोच आरोपी
या युवकांची चौकशी केली असता बिहार पोलिसांना चॅलेंज करणारा हाच आरोपी असल्याचं पुढे आलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली. बिहारमधील जवळपास पाच ते सहा गुन्ह्यात तो आरोपी असून फरार होता. गेल्या पाच वर्षांपासून तो नागपुरात लपून बसला होता. मात्र नागपुरात त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. भागलपूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे.
मोमीनपुरा परिसरात लपून बसलेला हा आरोपी कुख्यात हार्डकोर गुन्हेगार असून त्याने चक्क बिहार पोलिसांनाच चॅलेंज केलं होतं. मात्र नागपूर पोलिसांसमोर त्याचा टिकाव लागला नाही.
विक्की मिद्दूखेराची गोळी झाडून हत्या
दुसरीकडे, युवा अकाली दलाचा नेता विक्रमजीत सिंह उर्फ विक्की मिद्दूखेरा याची काही दिवसांपूर्वी भरदिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. कारमधून आलेल्या चौघा हल्लेखोरांनी पंजाबच्या मोहालीमधील मटोर येथे विक्कीची हत्या केली होती. बम्बिहा गँगने ही हत्या घडवून आणल्याचा संशय होता. त्यानंतर प्रतिस्पर्धी लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गँगस्टर संपत नेहरा याने ‘तेरी मौत का बदला, एक के बदले चार मारके लेंगे’ अशी केलेली फेसबुक पोस्ट खळबळ उडवून देत होती.
विक्की मिद्दूखेराची हत्या
विक्की मिद्दूखेराच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला होता. विक्की प्रॉपर्टी सल्लागाराकडे गेला होता. यावेळी चौघा हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. विक्कीने तिथून पळ काढला, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करुन हत्या केली. विक्कीच्या शरीरात बंदुकीच्या नऊ गोळ्या सापडल्या होत्या. राजकीय वर्चस्ववादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त झाला होता.
संबंधित बातम्या :
तेरी मौत का बदला, एक के बदले चार मारके लेंगे, युवा नेत्याच्या हत्येनंतर गँगस्टरचा इशारा
मैत्रिणीला भेटायला आला आणि अडकला, गँगस्टर सोनू पठाणला अटक, समीर वानखेडेंच्या पथकाची कारवाई