नागपूर : नागपूर येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या निवासी वसाहतीमध्ये एका महिला निवासी डॉक्टरची छळवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच त्या छळवणुकीचा गुप्तपणे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न दुसऱ्या निवासी डॉक्टरने केल्याचेही निष्पन्न झाले आहे. या घटनेने वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या तसेच परिसरातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला डॉक्टरने संपूर्ण प्रकाराबाबत महाविद्यालय प्रशासनाकडे तात्काळ तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने महाविद्यालय प्रशासनाने कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी सहा सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.
महाविद्यालयात याआधी डॉक्टरांच्या छळवणुकीचे तसेच महिलांच्या सुरक्षेला धक्का देणारे प्रकार घडलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने सुरक्षेबाबत कडक पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.
महिला निवासी डॉक्टरच्या छळवणुकीची बातमी सर्वत्र समजल्यानंतर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. महिला निवासी डॉक्टरच्या छळवणुकीचा संपूर्ण प्रकार दुसऱ्या निवासी डॉक्टरने अत्यंत गुप्तपणे व्हिडीओमध्ये कैद केला. गुरुवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. पीडित महिला निवासी डॉक्टर ही वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
कथित छळवणुकीबाबत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांच्या कार्यालयात रीतसर तक्रार केली. त्या तक्रारीमुळे निवासी डॉक्टरच्या बाबतीत घडलेला धक्कादायक प्रकार प्रकाशझोतात आला. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने निवासी डॉक्टरच्या अतिरेकी कृत्याबाबत कसून चौकशी सुरु केली आहे. ही चौकशी सुरु केल्यानंतर आरोपी डॉक्टरचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या मोबाईलमधील व्हिडीओ किंवा कुठलीही आक्षेपार्ह छायाचित्रे समोर आलेली नाहीत.