नागपूर : वयोवृद्ध व्यक्तीच्या गाडी समोर युवकानं गाडी लाली. तू माझ्या गाडीला कट मारली. माझ्या गाडीचं नुकसान झालं. त्याची भरपाई दे. मी गुंड आहे. तू नुकसान भरपाई दिली नाही तर मी तुला तलवारीने छाटून टाकेन. हातात तलवार घेऊन धमकी देणाऱ्या एका आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली. एक वृद्ध व्यक्ती आपल्या दुचाकीने जात होते. एक युवक एक्टिवा गाडी घेऊन त्यांच्या गाडीसमोर आला. त्यांना अडवत तलवार दाखवली.
तू माझ्या गाडीला कट मारली. माझं नुकसान झालं. तू मला 3 हजार रुपये दे. नाहीतर मी तुला छाटून टाकीन, अशी धमकी दिली. दोघांमध्ये वाद वाढत गेला. लोक त्या ठिकाणी जमले.
तेवढ्यात पेट्रोलिंगवर असलेले पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांना बघताच आरोपीने पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला अटक केली. त्याचा रेकॉर्ड तपासला असता याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं पुढे आलं.
अशी माहिती पाचपावली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.
पोलिसांनी अटक केलेला हा आरोपी कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला आता पोलिसांनी अटक केली. पण अशाप्रकारे भर रस्त्यात तलवार दाखवून लूटपाट करण्याचा प्रयत्न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.