सुनील ढगे, नागपूर, १ सप्टेंबर २०२३ : कोण कुणाला फसवेल काही सांगता येत नाही. नागपुरात असंच एक प्रकरण समोर आलं. मदतीच्या नावावर शेतकऱ्यांकडून कागदपत्र गोळा करण्यात आले. शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढण्यात आले. याची शेतकऱ्यांना माहितीच नव्हती. नोटीस मिळाल्यानंतर शेतकरी जागे झाले. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेऊ कोट्यवधी रुपयांची फसवणुकीचं धक्कादायक प्रकरण पुढं आलंय. या प्रकरणात जिल्ह्यातील १५१ शेतकऱ्यांची तब्बल ११३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास आता नागपूर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलाय. आरोपींनी गोदामात असलेले शेतकऱ्यांचे धान्य बँकेत गहाण ठेवत त्या मोबदल्यात ११३ कोटींचं कर्ज घेतले.
नागपूर जिल्ह्यातील मौदा, पारशिवनी, रामटेक या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झालीय. 2017 वर्षी हे कर्ज घेण्यात आलं होतं. आता बँकेने शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं. सरकारकडून ओल्या दुष्काळासाठी आर्थिक मदत मिळणार आहे, असं सांगत शेतकऱ्यांकडून शेतीचे कागदपत्रे घेण्यात आली. काही शेतकऱ्यांची बोगस कागदपत्रे सुद्धा तयार करण्यात आली. यासंदर्भात शेतकऱ्यांनी मौदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. मौदा पोलिसांनी १८ पेक्षा जास्त जणांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलाय.
नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी सहा आरोपी आहेत. आरोपींना संगणमत करून खोटो अकाउंट ओपन केले. कर्ज घेण्यात आले. या शेतकऱ्यांना काहीच माहिती नव्हती. शेतकऱ्यांच्या नावावर बँकेकडून पैसे घेतले. ७७ कोटी रुपयांची रक्कम आहे. व्याजाची रक्कम वाढली आहे. मौदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
आरोपी हे बँकेचे कर्मचारी आहेत. अशी फसवणूक कर्मचाऱ्यांशिवाय होऊ शकत नाही. अन्य काही आरोपी असू शकतात. रॅकेट आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यासोबत संगणमत करून ही फसवणूक केली आहे. अशा प्रकरणात कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा.
आरोपींनी शेतकऱ्यांकडून कागदपत्र प्राप्त केली. ते कागदपत्र बँकेला पुरवले. अपूर्ण कागदपत्र असताना कर्ज घेण्यात आले. याचा तपास पोलीस करत आहेत. २०१६-२०१७ मध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. असं सांगून कागदपत्र घेण्यात आले आहे. चौकशी सुरू झाली आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितलं.