बुलडाणा : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलडाण्यातून समोर आली आहे. 45 वर्षीय महिला पोलीस कर्मचारी गीता सुभाष बामंदे सोमवारी पहाटेच्या सुमारास फेरी मारायला गेल्या होत्या. चिखली रोडवर जात असतान विद्युत वितरण कार्यालयासमोर ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गीता बामंदे यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
हिमाचल प्रदेश येथून सफरचंद भरलेला ट्रक नांदेडकडे जात असताना हा अपघात घडला. चिखली रोडवरील विद्युत वितरण कार्यालयाच्या समोर ट्रक चालकाच्या हलगर्जीपणामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याला प्राण गमवावे लागले.
नेमकं काय घडलं?
45 वर्षीय गीता सुभाष बामंदे सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. यावेळी हिमाचल प्रदेशहून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या सफरचंदाने भरलेल्या ट्रकची त्यांना जबर धडक बसली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात
अपघाताची माहिती पोलीस विभागाला मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रक क्रमांक PB 03 BB 8139 आणि ट्रक चालक बाबुसिंग प्रेमसिंग अहिरे (राहणार पंजाब) याच्यासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महिला पोलिस कर्मचाऱ्याचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने शहर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आला आहे.
जालन्यात मॉर्निंग वॉकवेळी दोघींचा मृत्यू
दरम्यान, जालन्यामध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. मनिषा साहेबराव पाटील (वय 50) आणि अनिता शहादु पाटील (वय 48) अशी या दोन महिलांची नावे होती.
हा अपघात एवढा जोरदार होता की, एक महिला रस्त्याच्या बाजूला फेकली गेली, तर दुसऱ्या महिलेला या कारने 50 मीटरपर्यंत फरफटत नेले होते. या दोन्ही महिलांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
चंद्रपुरात पहाटे दोन तरुणांचा मृत्यू
दुसरीकडे, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन तरुणांना अज्ञात वाहनांनी धडक दिल्याची घटना काही महिन्यांपूर्वी चंद्रपुरात घडली होती. या भीषण धडकेमध्ये दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील आरमोरी मुख्य महामार्गावर ही घटना घडली होती. अपघात झाल्याचं स्थानिकांच्या लक्षात येताच तरुणांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.
संबंधित बातम्या :
मॉर्निंग वॉकला गेल्या अन् परतल्याच नाहीत, जालनामधून सावध करणारी बातमी!
पहाट ठरली अखेरची! मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 तरुणांना वाहनाची धडक, जागीच मृत्यू