अकोला : अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी या गावातील एका 32 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रवीण बाबूलाल पोळकट असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जाला कंटाळून त्याने आयुष्य संपवल्याचा आरोप आहे. याचं कारण म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःचा एक व्हिडिओ शूट केला होता. त्या व्हिडीओत त्याने आपल्या आत्महत्येला महिंद्रा कोटक कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा दावा केला आहे.
सोयाबीन आणि उडीदला भाव नसल्याने मी कर्जबाजारी झालो आहे. म्हणून मी आत्महत्या करत आहे, असं प्रवीणने आत्महत्येपूर्वी शूट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. या घटनेनंतर साखरी गावात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी येथील 32 वर्षीय अल्पभूधारक शेतकरी प्रवीण बाबूलाल पोळकट याच्याकडे वडिलांच्या नावाने फक्त तीन एकर कोरडवाहू शेती आहे. शेती पिकत नसल्या कारणाने वारंवार कर्ज काढून तो शेतीला लावायचा, मात्र शेतात पीकच येत नसल्याने ते कर्ज वाढतं गेलं.
या तीन एकर शेतीवर को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज आणि त्यासोबतच महिंद्रा कोटकचेही कर्ज आहे. त्याच्याकडे एक छोटा ट्रॅक्टरही होता, मात्र छोटा ट्रॅक्टर हा फायनान्स कंपनीचे अधिकारी घेऊन गेले. त्यामुळे प्रवीणची मानसिकता ठीक नव्हती. या सर्व गोष्टीचा त्याच्या मनावर परिणाम झाला आणि वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे तो अधिकच व्यथित झाला होता. त्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घरची परिस्थितीत बेताची
आत्महत्या केलेल्या प्रविणच्या वडिलांना तोंडाचा कर्करोग आहे. आई सतत आजारी असते, अशा परिस्थितीत अनेक अडचणींना तो तोंड देत होता. पत्नी, दोन मुलं आणि आई-वडिलांचा सांभाळ करायचा. आई-वडिलांना प्रवीण हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेनंतर त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
बँकेचे कर्ज आणि महिंद्रा कोटक या कंपनीकडून त्याच्याकडे वारंवार होणारा वसुलीचा त्रास, यामुळे प्रवीणने आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्याने मृत्यूपूर्व व्हिडिओ काढला आणि स्वतःच्या मृत्यूला महिंद्रा कोटकचे अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही, असेही त्याने व्हिडीओत सांगितले आहे. व्हिडीओ बनवल्यानंतर त्याने विष घेऊन आत्महत्या केली. मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
चाकूच्या धाकाने लुटले पावणेदोन कोटी, 15 तासांत पोलिसांनी केले जेरबंद
नको तिथं डोकं! खिडकीतून घुसण्यासाठी चोराने तीन महिन्यात 10 किलो वजन घटवलं, 37 लाखांवर डल्ला
लग्न ठरल्यानंतर अश्लील मेसेज पाठवणे हा भावी जोडीदाराच्या विनयशीलतेचा अपमान नाही : कोर्ट