अमरावती : अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याच्या मार्गावर आहे. अनिल मुळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप समोर आली आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मुळेंनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.
अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या अनिल मुळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 14 ऑगस्टला समोर आली होती. या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यासह शहरात खळबळ उडाली होती.
काय आहे ऑडिओ क्लीप
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या मित्राला अनिल मुळे सांगत आहेत, की माझी काही चुकी नसताना मला वरिष्ठांकडून त्रास दिला जात आहे. मला दोन वेळा आपल्या वरिष्ठांनी शिक्षा केली आहे. मी पोलीस कमिश्नर आरती सिंह यांना सुद्धा भेटलो, तरी सुद्धा त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही. तर माझी बदली झाली, प्रमोशन होऊन सुद्धा माझं इन्क्रीमेंट रोखलं. माझी पीआय हजर करुन घेत नाही आहे, सीपी ऑफिसला जा म्हणते, तर सीपी ऑफिस पीआयकडे जा, म्हणत आहे. यावरुन, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अनिल मुळे यांनी आत्महत्या केल्याचं ऑडिओ क्लीपवरुन दिसत आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस तपास करत आहेत.
लिंबाच्या झाडाला गळफास
अनिल मुळे हे सुरुवातीला गाडगे नगर पोलीस ठाण्यात तर दुसऱ्यांदा राजापेठ पोलीस स्टेशन येथे तर आता फ्रेजरपुरा येथे कार्यरत होते. जवळपास आठ वर्ष त्यांनी काम केलं होतं. मुळे हे कटोरा नाका, रिंग रोड परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या राहत्या घराजवळ गोल्डन लिफ मंगल कार्यालयाच्या समोरील लेआऊटमध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं होतं.
संबंधित बातम्या :
अमरावतीत पोलीस उपनिरिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, विभागात खळबळ
निरोप समारंभ झाला, बदलीनंतर नव्या ठिकाणी रुजू होण्याआधी अहमदनगरात पोलिसाचा गळफास