भंडारा : सकाळच्या सत्रातील शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत नाल्यावर पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून (Students Drown) मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात (Bhandara) साकोली लगतच्या सेंदुरवाफा येथे घटना उघडकीस आली आहे. शोध मोहिमेनंतर रात्री उशिरा मुलांचे मृतदेह सापडले आहेत. धवल रामू परशुरामकर (वय 11, रा. सेंदुरवाफा) आणि भावेश अशोक भोंडे (रा. प्रगती कॉलनी) अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत. दोघंही नवजीवन कॉन्व्हेंटमध्ये पाचव्या वर्गात शिकत होते. त्यांच्या अकाली मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकल्यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी सकाळच्या सत्रातील शाळेत धवल सायकलने गेला होता, सकाळी 11 वाजले तरी तो घरी परत आला नाही,त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. काही वेळात प्रगती कॉलनीजवळ असलेल्या नाल्याजवळ एक सायकल असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पालकांसह पोलिसांनी तेथे धाव घेतली. शोध मोहीम राबवली असता रात्री उशिरा धवल आणि भावेशचा मृतदेह आढळून आला.
विशेष म्हणजे दोघे बुडत असल्याचे पाहून मित्र तिथून पळून गेले होते. त्यांनी कुणालाही माहिती दिली नसल्याने सायंकाळपर्यंत घटनेची माहिती मिळाली नव्हती. अखेर उशिरा शोध मोहिमेनंतर मृतदेह आढळले आहेत.
संबंधित बातम्या :
काळही आला, वेळही आली, मधमाशांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी कालव्यात उडी, तरुणाचा बुडून मृत्यू
दौंडमध्ये तीन युवकांचा तलावात बुडून मृत्यू
सहा महिन्यांपूर्वी एकुलता एक मुलगा गेला, फवारणी करताना हार्ट अटॅकने शेतकरी पित्याचा मृत्यू