भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील वैनगंगा नदी (Vainganga River) स्थानिक शेतकरी आणि उद्योजकांचे भरण-पोषण करत असल्यामुळे तिला जीवनदायिनी म्हणून ओळखले जाते. मात्र काही वर्षापासून याच वैनगंगा नदीत अनेक जणांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याचं समोर आलं आहे. जवळपास 17 जणांनी वैनगंगेत आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे ही जीवनदायिनी नदी मृत्यूवाहिनी संबोधली जाणार की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
भंडारा जिल्ह्याला वैनगंगा नदीचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. या वैनगंगेच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील शेती सुजलाम-सुफलाम झालेली आहे. तर अनेक जिल्ह्यातील उद्योजकांना भरभराट आली आहे. मात्र मागील दीड वर्षापासून हीच वैनगंगा नदी आत्महत्येचा स्पॉट होत असल्याने गालबोट लागले आहे.
भंडारा जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात तब्बल 17 जणांनी वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आपले जीवन संपवले आहे. लोकांची मानसिकता लक्षात घेता ही आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे वैनगंगा महोत्सव साजरा करत वैनगंगा नदीचे सुजलाम-सुफलामतेचे गुणगान गायले जात आहे. तर दुसरीकडे त्याच ठिकाणी वाहत असलेले मृतदेह पाहून वैनगंगा नदीला सुद्धा रडू येत आहे.
पोलीस प्रशासनाने या संबंधित सुसाईड स्पॉटला शोधून त्या ठिकाणी पोलिस सुरक्षा पुरवण्याची मागणी जनमानसातून केली जात आहे. जेणेकरुन नैराश्याने ग्रासलेली व्यक्ती आपल्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्यास आल्यास त्यांचे प्राण बचावतील.
संबंधित बातम्या :
पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या
धुळवडीनंतर अंघोळीला नदीवर गेला युवक, पोहता येत नसल्याने वैनगंगा नदीत बुडून मृत्यू