बुलडाणा : सून विहिरीत पाय घसरुन पडल्याचा सासरच्या मंडळींनी केलेला बनाव अखेर उघड झाला आहे. विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीसह सासऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथे हा प्रकार घडला होता. मात्र तिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची तक्रार तिच्या भावाने केल्यानंतर हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.
शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथे घडली होती. दरम्यान, ती विहिरीत पडली नसून, तिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृत विवाहितेच्या भावाने हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी सासरच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील विवाहितेच्या पतीसह सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील 24 वर्षीय लक्ष्मी गजानन राठोड ही दोन दिवसांपूर्वी शेतात हरभरा सोंगण्यासाठी गेली होती. दुपारी शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर तिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली होती. मात्र तिचा पाय घसरून विहिरीत पडल्याचे तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले होते.
दरम्यान मृत लक्ष्मीच्या भावाने हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून लक्ष्मीचा पती, सासू, सासरा, दीर यांच्यासह जावा तिचा छळ करत होत्या, त्यामुळे तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, अशी पोलिसांत तक्रार देण्यात आली. यावरुन हिवरखेड पोलिसांनी लक्ष्मीच्या सासरकडील 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामध्ये लक्ष्मीचा पती गजानन राठोड, सासरा जानकीराम राठोड, सासू फुलाबाई राठोड , गजाननचे तीन भाऊ , तिघांच्या पत्नी अशा नऊ जणांचा समावेश आहे. यापैकी जानकीराम राठोड आणि गजानन राठोड या दोघा बापलेकांना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या :
बायकोने Video Call वर मुलीचा चेहरा न दाखवल्याने नाराज, बदलापुरात पतीची आत्महत्या
लातूरमधील पोलीस कर्मचारी आत्महत्या प्रकरण, सुसाईड नोटवरुन 12 जणांवर गुन्हा
पोलिस उपनिरीक्षक वाशिमला, अमरावतीत पत्नीची आत्महत्या, आईचा मृतदेह पाहून लेकरांचा टाहो