बुलडाणा : हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला बाप पॅरोलवर सुटून आल्यानंतर मुलाने त्याची हत्या केली. दारु पिण्यासाठी पैसे मागून आई आणि बहिणींना त्रास देत असल्याच्या रागातून मुलाने बापाचा खून केल्याचा आरोप आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे घडली आहे. या प्रकरणी घटनास्थळावरून श्वानाने दाखवलेला मार्ग आणि पुरावे पाहता पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील संगीत इंगळे या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. संग्रामपूर ते वरवट मार्गावर मधुकर बकाल यांच्या शेताजवळ पहाटे तामगाव पोलिस हे गस्तीवर असताना त्यांना मृतदेह सापडला होता. मृतदेहाचा पंचनामा करुन ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दिवसभर चौकशी केली असता दारू पिऊन कुटुंबाला त्रास देणार्या वडिलांचा मुलाने साथीदारासोबत तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचे समोर आले. तात्काळ या घटनेची तपास चक्र फिरवले असता श्वान पथक पाचारण करण्यात आले.
मुलाची कबुली
मयत संगीत राजाराम इंगळे (वय 49) याचा मुलगा विपुल संगीत इंगळे याला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता माझा बाप दारु पिऊन मारहाण करून त्रास देत होता, याच त्रासाला कंटाळून लाकडी दांड्याने मारुन त्याला ठार केले. मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळवून साथीदार राजेश भाटकर याच्या मदतीने मोटारसायकलच्या साहाय्याने गावाबाहेर नेऊन फेकून दिल्याचे त्याने कबूल केले.
पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल करत अटक केली आहे. संगीत राजाराम इंगळे याने दहा वर्षांपूर्वी गावातीलच व्यक्तीचा खून केला होता. हत्या प्रकरणात तेव्हापासून संगीत हा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. मात्र अलिकडे तो पॅरोलवर काही दिवसांसाठी घरी आला होता.
संबंधित बातम्या :
दहा दिवस पोलिसांना गुंगारा, पोटच्या पोरीला टाकीत बुडवून मारणारी आई Google मुळे कशी सापडली?
अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर