चंद्रपूर : चंद्रपुरात शाळेची घंटा वाजली आणि पहिला दिवशी गुरुजींना बेड्या पडल्या. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील तुकुम गावातील जिल्हा परिषद शाळेत हा संतापजनक प्रकार घडल्याची माहिती आहे. इतर विद्यार्थिनींना स्वच्छता मोहिमेसाठी पाठवून मुख्याध्यापकाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. सात विद्यार्थिनी तक्रारदार असलेल्या या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
राज्यभरात शाळा सुरु झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील तुकूम गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक भाऊराव तुमडे यांनी शाळेत पोहोचलेल्या पाचव्या इयत्तेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले.
नेमकं काय घडलं?
शाळेचा पहिला दिवस असल्याने फक्त काही विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत पोहचले होते. पीडित विद्यार्थीनी इयत्ता पाचवीत शिकते. मुख्याध्यापकाने वर्गातील इतर मुलांना साफसफाईसाठी बाहेर पाठवले आणि त्या आदिवासी मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलीने ही माहिती आधी मैत्रिणींना सांगितली, त्यांनी पालकांना माहिती दिली. माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शाळेत पोहोचत मुख्याध्यापक तुमडे यांना खोलीत बंद करून पोलिसांना तक्रार केली.
मुख्याध्यापकाला खोलीत कोंडलं
पंचायत समिती बल्लारपूरचे गटशिक्षण अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांनी घटनास्थळ गाठले. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून कारवाई केली आणि जमावाला हुसकावून लावले. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
शाळेतील 7 विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करत अटक केली आहे. पोलीस पोहोचल्याने या गावात मोठा अनर्थ टळला. या संतापजनक घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस करत आहेत.
पुण्यात 12 विद्यार्थिनींचा विनयभंग
दुसरीकडे, जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल 12 विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. पुण्यातील विमानतळ पोलिसांनी कारवाई करत या शिक्षकाला बेड्या ठोकल्या होत्या. जिल्हा परिषद शाळेतील हा शिक्षक मधल्या सुट्टीत विद्यार्थिनींची छेड काढत असल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता.
संबंधित शिक्षक हा पुण्याच्या लोहगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. सहा महिन्यांपासून तो शाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग करत होता. मधल्या सुट्टीत विद्यार्थिनींना बोलावून तो त्यांची छेड काढायचा, अश्लील चाळे करायचा असा आरोप विद्यार्थिनींनी केला होता. तसेच ही बाब विद्यार्थिनींनी कुणालाही सांगू नये यासाठी विक्रम त्यांना धमकवायचा, असेही विद्यार्थिनींनी सांगितले होते. सहाव्या वर्गातील 12 विद्यार्थिनींसोबत हा प्रकार घडत होता.
हा सर्व प्रकार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी याबाबत चौकशी केली. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी शिक्षकाला अटक करुन त्याच्यावर विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
संबंधित बातम्या :
मधल्या सुट्टीत 12 विद्यार्थिनींचा विनयभंग, पुण्यातील शिक्षकाला बेड्या
अकरावीतील विद्यार्थिनीची छेड, उस्मानाबादेत 19 वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरी