नागपूर : नागपूर शहरात 2011 मध्ये मोनिका किरणापुरे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली होती. आरोपीने एकतर्फी प्रेमातून दुसऱ्याच तरुणीच्या हत्येची सुपारी दिली होती. मात्र अंगकाठीतील साधर्म्यामुळे स्कार्फ घातलेली मोनिकाच ‘ती’ तरुणी असल्याचा काँट्रॅक्ट किलर्सचा गैरसमज झाला आणि मोनिकाची हत्या झाली. मास्टरमाईंड कुणाल जयस्वाल याच्यासह चार आरोपींना नागपूर जिल्हा कोर्टाने 1.15 लाख रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर पुराव्यांच्या अभावी दोघा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
11 मार्च 2011 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नागपूरच्या नंदनवन भागातील के. डी. के. कॉलेजजवळ दोन-तीन हल्लेखोरांनी मोनिका किरणापुरेची हत्या केली होती. मोनिका ही इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. वसतिगृहातून महाविद्यालयात पायी जात असताना 22 वर्षीय मोनिकावर चाकूने वार करुन हत्या करण्यात आली होती. पाठीत सुरी खुपसलेल्या अवस्थेत मोनिका जवळपास दहा मिनिटं रक्तबंबाळ होऊन रस्त्यात पडून होती. गंभीर जखमी झालेल्या मोनिकाला एका वाटसरुने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मोनिकाचा मृत्यू झाला होता.
गैरसमजुतीतून हत्या
नंदनवन पोलिसांना तपासात आढळले, की आरोपी कुणाल जयस्वाल याने सुपारी देऊन इतर आरोपींच्या माध्यमातून ही हत्या घडवून आणली होती. आरोपीला दुसऱ्या मुलीची हत्या करायची होती, पण मोनिकाचा चेहरा स्कार्फने झाकलेला होता. अंगकाठीतील साधर्म्यामुळे काँट्रॅक्ट किलर्सची तिला ओळखण्यात गफलत झाली आणि गैरसमजुतीतून (misidentify) मोनिकाची हत्या झाली. पोलीस तपासानुसार आरोपी कुणालला बदला घेण्यासाठी दुसऱ्या मुलीची हत्या करायची होती.
आरोपींना जन्मठेप
नागपूर जिल्हा न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवानी यांनी निकाल देताना या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कुणाल जयस्वाल याला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. इतर आरोपी उमेश मराठे, प्रदीप सहार आणि श्रीकांत सोनेकर यांनाही जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दंडाची रक्कम मृत मोनिकाच्या पालकांनी देण्याचे आदेश देण्यात आले होते. रामेश्वर सोनेकर आणि गीता मालदुरे यांना या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्यासाठी आरोपी बनवण्यात आले होते, त्यांना पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष घोषित केले होते.
मुख्य आरोपी कुणाल जयस्वालसह चार आरोपींना मोनिकाच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले होते. आरोपींना कठोर शिक्षा का दिली जाऊ नये? यावर निर्णय घेण्यासाठी युक्तिवाद करण्यात आला होता. फिर्यादीच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. बचाव पक्षातर्फे वकील सुदीप जयस्वाल म्हणाले की, आरोपींचे तरुण वय आणि गुन्हेगारी इतिहास नसल्याचे लक्षात घेता त्यांना कमी शिक्षा दिली पाहिजे. मात्र कोर्टाने आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते.
संबंधित बातम्या :
25 वर्षीय ब्युटीशियनचा गळा चिरला, आई-काकाने 2000 मध्ये केलेली हत्या