नागपुरात गुन्हेगारीचा सुळसुळाट, हत्या प्रकरणात देशात अव्वल, पाटणा-लखनौ-दिल्लीलाही मागे टाकले

| Updated on: Sep 21, 2021 | 3:03 PM

वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागपूरने गुन्हे क्षेत्रात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या क्षेत्रात आता राज्यातील इतर शहरांसोबत तुलनाच होऊ शकत नसल्याने नागपूर शहराने आपली वाटचाल राष्ट्रीय पातळीवर सुरु केली आहे.

नागपुरात गुन्हेगारीचा सुळसुळाट, हत्या प्रकरणात देशात अव्वल, पाटणा-लखनौ-दिल्लीलाही मागे टाकले
कांदिवलीत तरुणाची निर्घृण हत्या
Follow us on

नागपूर : नागपूर शहरात गंभीर गुन्हे दिवसागणिक वाढताना दिसत आहेत, त्यामुळेच दुर्दैवाने नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून देखील ओळख मिळाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झाले आहे. शहरात वर्षाला शंभरच्या वर हत्या होत असल्याची कबुली पोलिसही देत असले तर शहराच्या सीमा वाढल्या असून त्या लोकसंख्येचा उल्लेख त्यात नसल्याने आकडा मोठा दिसत असल्याचं सांगितलं जात आहे.

नागपूरच्या गुन्हेगारीची राष्ट्रीय स्तरावर ओळख

वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागपूरने गुन्हे क्षेत्रात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या क्षेत्रात आता राज्यातील इतर शहरांसोबत तुलनाच होऊ शकत नसल्याने नागपूर शहराने आपली वाटचाल राष्ट्रीय पातळीवर सुरु केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारी वरून हे स्पष्ट झाले आहे.

पुणे-मुंबई कितव्या स्थानी

नागपूर शहरात वर्षाकाठी सरासरी शंभर खुनाच्या घटना घडतात. गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटणा, लखनौ आणि दिल्लीसारख्या शहरांशी नागपूरची बरोबरी होत आहे. राज्यातील पुणे दहाव्या स्थानावर, तर मुंबई 16 व्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे आता नागपूर शहरात कायद्याचे राज्य आहे, की गुन्हेगारांचे? या प्रश्नाचे उत्तर नागपूर पोलिसांनी द्यायलाच हवे.

यूपी-बिहार-दिल्लीलाही मागे सोडले

नागपूर शहर गंभीर गुन्ह्यांसाठी नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. नागपूरकर जनतेसाठी आणि पोलीस यंत्रणेसाठी ही काही गौरवाची बाब नाही. मात्र आता नागपूरने गुन्ह्यांच्या बाबतीत देश पातळीवर गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बिहार राज्यातील पाटणा, उत्तर प्रदेशमधील लखनौ आणि दिल्ली सारख्या शहरांना मागे टाकत असल्याचे आकडे समोर आल्याने गृहमंत्रालासह पोलिसांची चिंता देखील वाढली आहे.

नागपूर शहराच्या हद्दवाढीचा रेकॉर्डमध्ये विचार नाही

या संदर्भात शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे वेगळेच तर्क आहेत. त्यांच्या मते नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे नागपूर शहराची लोकसंख्या 25 लाख असल्याची नोंद आहे, मात्र नागपूर शहराचा विस्तार झाला आहे. ग्रामीण नागपूरच्या अनेक भागांचा नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत समावेश झालेला आहे, त्यामुळे दर एक लाख लोकसंख्येमागे हत्या प्रकरणात नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर दाखवत असले, तरी पोलीस आयुक्तालयाचा झालेल्या विस्तराचा यामध्ये विचार करण्यात आलेला नसल्याचं ते सांगतात.

नागपूरने यंदा पाटण्यालाही मागे टाकले

नागपुरात हत्या प्रकरणाचा दर 3.9 टक्के आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2020 वर्षाच्या गुन्हे विषयक अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे नागपुरात हत्येच्या प्रकरणांचा दर 3.9 टक्के एवढा असून हा देशात सर्वाधिक आहे. या अहवालानुसार 2020 मध्ये बिहारची राजधानी पाटणामध्ये हत्येची 79 प्रकरणं नोंदवली गेली असून दर एक लाख लोकसंख्येच्या प्रमाणे पाटण्यात हत्येचा दर 3.85 आहे. म्हणजेच दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणासंदर्भात नागपूरने यंदा पाटण्याला ही मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी यासंदर्भात नागपूरचे स्थान पाटण्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी 2019 मध्ये नागपुरात हाच दर 3.6 टक्के होता, तर पाटण्यात तो 4.9 टक्के एवढा होता. म्हणजेच दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात पाटण्याची स्थिती सुधारली आहे तर नागपुरात स्थिती आणखी बिघडली आहे.

नागपूर शहरात वीस वर्षात 2022 खुनाच्या घटना झाल्या आहेत, त्यानुसार वर्षाकाठी शंभर खून होतात. ही संख्या वाढलेली आहे ही वस्तुस्थिती आहे, मात्र ही आकडेवारी आज वाढलेली नाही. नागपुरात वर्ष 2020 मध्ये हत्येची 97 प्रकरणं नोंदवली गेली होती. त्यामुळे आता याकडे लक्ष देऊन गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याची गरज व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

नागपूर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरलं, गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून दगडाने ठेचून हत्या

भर दिवसा रस्त्यावर थरार, दोन गुंड आमनेसामने, दोघांमध्ये संघर्ष, कुख्यात गुंडाची हत्या

2016 मधील हत्याकांडातून पुराव्याअभावी सुटलेल्या गुंडाची नागपुरात हत्या