नागपूर : नागपुरात हत्येचं सत्र सुरुच आहे. शहरात अगदी शुल्लक कारणांवरुन हत्येच्या घडना घडत आहेत. त्यामुळे नागपुरात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न नागपूरकरांच्या मनात उपस्थित होतोय. विशेष म्हणजे यावेळी तर मामा-भाचाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधमाने क्षुल्लक कारणावरुन आपल्या सख्ख्या भाच्याची हत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मामा-भाच्यात नेमकं असं काय घडलं की ज्यात मामाने थेट भाच्याची निर्घृणपणे हत्या केली? असा प्रश्न आता शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.
संबंधित घटना ही नागपूरच्या सदर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. आरोपीचं नाव दिनेश लोखंडे असं आहे. तर मृतक भाच्याचं नाव अतुल अईके असं आहे. संबंधित घटना ही शुक्रवारी (8 ऑक्टोबर) रात्री घडली. आरोपी दिशेन लोखंडेचं आधी आपल्या पत्नीसोबत कडाक्याचं भांडण झालं. या भांडणानंतर आरोपीने आपल्या मुलाला भाचा अतुला याला बोलवून आणण्यास सांगितला. आरोपी आणि भाचा हे वेगेवगळ्या घरात राहत असले तरी त्यांचे घर हे सदर पोलीस ठाणे हद्दीतच जवळ-जवळ आहे. त्यामुळे त्याने पत्नीसोबत भांडणानंतर आपल्या मुलातर्फे भाच्याला घरी बोलावणं धाडलं.
मामाने बोलावल्यानंतर अतुल आपल्या मामेभावासोबत मामाच्या घरी आला. पण तिथे त्याचा मामा नव्हता. त्यामुळे दोघे मामेभाऊ-आतेभावाने मिळून त्याला शोधायला सुरुवात केली. या दरम्यान अखेर त्यांची आरोपी दिनेशसोबत भेट झाली. ज्यावेळी मामा-भाच्याची भेट झाली त्यावेळी मामा चांगलाच भडकलेला होता. मामा दिनेशने भाचा अतुल याच्यावर आरडाओरड सुरु केली. त्याच्यासोबत वाद घालत त्याला शिवीगाळही केली. यावेळी भाच्याने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. पण दिनेश रागाच्या भरात आपलं देहभान हरपलेला होता. त्याने रागात लोखंडी रॉडने थेट अतुलवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांना संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने सदर पोलिसांना संपर्क करुन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर परिसरात चौकशी करत सर्व प्रकरण जाणून घेतलं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलं. पोलिसांनी तातडीने आरोपी मामाच्या मुसक्या आवळत त्याला बेड्यादेखील ठोकल्या. पण या घटनेमुळे शहरात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. नागपूर शहराला शांततेचं ग्रहण लागलं आहे की काय? असा सवाल उपस्थित होतोय.
हेही वाचा :