नागपूर : चोरी, दरोडे, घरफोडी सारखे वेगवेगळे गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीला नागपूरच्या अजनी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अटक (Arrest) केली आहे. आरोपीकडून एक लोखंडी पिस्तुल (Pistol) आणि काही काडतुसं (Cartridges) जप्त करण्यात आली आहेत. आरोपी कुठेतरी घातपात करण्याच्या तयारीत होता, असा पोलिसांचा अंदाज आहे. गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याकडील शस्त्र जप्त केली. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. आरोपी या शस्त्रांचं नेमकं काय करणार होता याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.
अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक आरोपी पिस्तुल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. यावेळी पोलिसांना एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याचे आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक देशी कट्टा आणि काडतुसं मिळून आले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याचा अनेक गुन्ह्यांमध्ये समावेश असल्याचं निष्पन्न झालं. चोरी, दरोडा लुटमार अशा प्रकारचे वेगवेगळे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो मुळचा मध्य प्रदेशातील असून गेल्या काही वर्षात तो नागपुरात वास्तव्यास होता. पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे. आरोपीचे आणखी साथीदार आहेत का याचा सुद्धा तपास पोलीस करत आहेत. अशा प्रकारे गुंडाजवळ सर्रासपणे बंदुका नेमक्या येतात कुठून ? हा मोठा प्रश्न आहे. बेकायदेशीर शस्त्र विक्रीला आळा घालणे गरजेचे आहे. (Nagpur police have arrested a man accused of burglary, pistol and cartridges seized)