नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजाराच्या मुसक्या चांगल्याच आवळल्या गेल्या आहेत. नितीन गडकरी यांना त्याने बेळगाव तुरुंगातून दोनदा धमकी दिली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात नागपूर पोलीस यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जयेश पुजाराची लिंक पीएफआय, दाऊद इब्राहिम आणि लष्कर ए तोयबाशी असल्याचं कळतं. सध्या तो नागपूर पोलिसांच्या कस्टडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. नागपूर पोलीस त्याला बेळगावहून नागपूरला घेऊन आलेली आहे.
जयेश पुजाराला फाशीची शिक्षा झालेली आहे. त्याने गडकरींच्या कार्यालयात दोन वेळा फोन करत खंडणी मागितली होती. याच प्रकरणात बेळगाव तुरुंगातून ताबा घेत नागपूर पोलीसांनी जयेश पुजारा याला नागपुरात आणलंय. आता गडकरींना धमकी देण्यामागे त्याचा काय उद्देश होता? याबाबत जयेश पुजाराची नागपूर पोलीस कसून चौकशी करतायत. बेळगावच्या तुरुंगात राहून याच जयेश पुजाराने गडकरींच्या कार्यालयात फोन करुन 100 कोटींची खंडणी मागीतली होती.
जयेश पुजाराने 14 जानेवारीला पहिल्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन केला. स्वतः डी गॅंगशी संबंधीत असून 100 कोटींच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर पोलीसांनी बेळगाव जेलमध्ये सर्च ॲापरेशन राबवलं होतं, पण काही हाती लागलं नाही. दुसऱ्या वेळेस 21 मार्चला जयेश रुजाराने पुन्हा गडकरी यांच्या कार्यालयात फोन केला आणि 10 कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर मात्र नागपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली. जयेश पुजाराने 10 कोटी जमा करण्यासाठी ज्या बंगरुळु येथील मुलीचा नंबर दिला, तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर बेळगाव जेलमध्ये सरप्राईज सर्च ॲापरेशन राबवलं. जयेश पुजाराकडून दोन फोन आणि दोन सीमकार्ड जप्त केले. याच पुराव्याच्या आधाऱ्यावर जयेश पुजाराला नागपूर पोलीसांनी ताब्यात घेतलंय.
बेळगाव तुरुंगातून थेट देशातील दिग्गज केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात खंडणीसाठी फोन आल्याने जयेश पुजाराच्या या धमकीच्या फोनने नागपूर पोलीसांचीही झोप उडाली होती. पण आता जयेश पुजाराचा ताबा मिळाल्यानंतर नागपूर पोलीस त्याची कसून चौकशी करतायत. या धमकीमागे जयेश पुजाराचा उद्देश काय होता? याची चौकशी सध्या नागपूर पोलीस करतायत.
गडकरींना धमकी दोणारा नागपूर पोलीसांच्या ताब्यात
आरोपी जयेश पुजाराला बेळगाव तुरुंगातून घेतलं ताब्यात
नितीन गडकरींच्या कार्यालयात दोन वेळा केला खंडणीसाठी फोन
14 जानेवारीला 100 कोटींची खंडणी मागितली होती
21 मार्चला फोन करुन 10 कोटींची खंडणी मागितली होती
नागपूर पोलीस जयेश पुजाराची कसून चौकशी करणार
जयेश पुजारा बेळगाव जेलमधील फाशीचा आरोपी