Nagpur : लग्न मोडल्यानं पोलिसाला नैराश्य? नागपुरातील तरुण पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या!

| Updated on: Apr 25, 2022 | 7:54 AM

Nagpur Police Suicide : सुरुवातीला किरण यांनी आत्महत्या का केली? याचं कारण कळू शकलं नव्हतं.

Nagpur : लग्न मोडल्यानं पोलिसाला नैराश्य? नागपुरातील तरुण पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या!
पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर : लग्न मोडल्यामुळे नैराश्य आलेल्या पोलिसानं आत्महत्या (Police Employee Suicide) केल्याची धक्कादायक घटने समोर आली आहे. नागपुरातील धरमपेठ (Dharamapeth, Nagpur) इथं एका पोलिसानं आपलं आयुष्य संपवलंय. पोलीस वसाहतीमधील घरात गळफास घेऊन पोलिसानं आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. किरण सलामे असं आत्महत्या करणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. त्यांना नैराश्य आलं होतं, असं सांगितलं जातंय. लग्न मोडल्यामुळे ते नैराश्यात होते, असंही बोललं जातंय. दरम्यान, आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरु नका, असा उल्लेख त्यांच्या सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) करण्यात आला आहे. किरण सलामे यांनी आत्महत्या केल्यानं नागपूर पोलिस दलातही एकच खळबळ उडाली.

2014 पासू पोलिसात..

मूळचा कोंढाळी येथील रहिवासी असलेला किरण सलामे 2014 मध्ये शहर पोलीस दलात रुजू झाले. गेल्या एक वर्षापासून ते पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते धरमपेठ परिसरातील पोलिस वसाहतीत आई आणि छोट्या भावासह राहत होते. त्यांचा भाऊ खाजगी कंपनीत नोकरी करतो.

केव्हा केली आत्महत्या?

शनिवारी किरणची सुट्टी होती. त्यामुळे ते सायंकाळनंतर घराबाहेर पडले आणि रात्री 10.30 च्या सुमारास घरी परतले. घरी परतल्यानंतर किरण बाजूच्या रिकाम्या खोलीमध्ये झोपायला गेले. रविवारी सकाळी त्यांच्या आईने त्यांना आवाज दिला. मात्र दार आतून बंद होते. वारंवार आवाज देऊनही ते प्रतिसाद देत नसल्याने आईने शेजाऱ्यांना सांगितले.

शेजारच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वरच्या भागातून डोकावले असता किरण गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. हे पाहून पोलीस कर्मचाऱ्यांसह सगळ्यांच मोठा धक्का बसला.

लग्न मोडल्यानं जीव दिला?

सुरुवातीला किरण यांनी आत्महत्या का केली? याचं कारण कळू शकलं नव्हतं. दरम्यान, आता त्यांची सुसाईड नोटही पोलिसांच्या हाती लागली आहे. यात त्यांनी आपल्या मृत्यूस कुणालाही जबाबदार धरलं नसल्याचंही म्हटलंय. मात्र लग्न मोडल्यामुळे किरण नैराश्यात होते, अशी माहिती समोर येते आहे. कामाच्या ताणातून त्यांनी आत्महत्या केली का? असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, आता लग्न मोडल्यानं त्यांनी निराश होऊन आयुष्य संपवलं असावं, अशीही शक्यता वर्तवली जाते आहे. नागपूर पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जातोय.