चंद्रपूर : कधीकधी जवळचेच माणसं घात करतात, अशी एक म्हण आहे. ही म्हण खरंच बरोबर आहे. काहीवेळा आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच लोक विश्वासघात करतात. या विश्वासघाताची माहिती जेव्हा आपल्याला होते तेव्हा माणूस आतमधूनच खचतो. असाच काहिसा प्रकाच चंद्रपुरात समोर आला आहे. चंद्रपुरात एका सावकाऱ्याच्या घरात गुरुवारी रात्री (5 ऑगस्ट) चोरीची घटना घडली होती. घरात कुणी नसताना चोरट्यांनी घरफोडी करुन पैसे लंपास केले होते. पण पोलिसांनी चोरांना 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा सावकाराचा वाहनचालकच असल्याचं समोर आलं आहे.
चंद्रपूर शहरातील माऊंट कारमेल शाळेच्या लगत राहणाऱ्या राजेंद्र जयस्वाल यांच्या घरी 40 लाख रुपयांची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी 24 तासांच्या आत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्यात जयस्वाल यांचा वाहनचालकच मुख्य आरोपी म्हणून पुढे आला आहे. आरोपीचं नाव सादिक शेख असं आहे.
राजेंद्र जयस्वाल चंद्रपूर जिल्ह्यातील बडे परवानाधारक सावकार आहेत. त्यांच्या वाहनचालकाची त्यामुळेच घरी ये-जा असायची. वाहनचालक सादिक शेख याला गुरुवारी रात्री जयस्वाल यांच्या घरी कुणीही नाही याची माहिती होती. याच गोष्टीचा फायदा घेऊन तो आपले सहकारी महेश श्रीरामवार आणि चेतन तेलसे याच्यासह घरात शिरला. त्याने सुमारे 15 लाख रुपये रोख रक्कम आणि इतर सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज लुटला. त्यानंतर हे तिघेही पसार झाले.
अखेर जयस्वाल यांचे कुटुंबिय घरी आले तेव्हा त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतत विविध पथके तयार करत तपास सुरु केला. पोलिसांचा तपासादरम्यान वाहनचालकांवर संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं. यावेळी आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपींकडून रोख रकमेसह दागिने असा एकूण 40 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
हेही वाचा :
प्रेम केलं, प्रेयसीच्या भेटीला गेला, तिच्या कुटुंबियांनी मरेस्तोवर मारलं, प्रियकराचा करुण अंत