गरिबांचे हक्काचे रेशन व्यापाऱ्यांच्या दुकानात; सरकारने दिलेल्या धान्याची लूट

| Updated on: Feb 24, 2023 | 5:36 PM

गरिबांच्या हक्काचे चार हजार किलो तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी जाताना पकडण्यात पोलिसांना यश आलं. अशी माहिती कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली.

गरिबांचे हक्काचे रेशन व्यापाऱ्यांच्या दुकानात; सरकारने दिलेल्या धान्याची लूट
Follow us on

नागपूर : गरीब माणसाला सरकारकडून स्वस्त दरात मिळते. या तांदळाची काळाबाजारी करून मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक प्रयत्न फसला. कळमना पोलीस स्टेशन हद्दीत चिखली रोडवर एक बोलेरो पिकअप गाडी बंद पडली. त्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याची चौकशी केली. गाडीमध्ये तांदूळ असल्याचं पुढं आलं. यावरून पोलिसांनी वाहन चालकाला बिल संबंधित विचारणा केली. त्यांच्याकडे कुठलेही बिल नव्हतं. हे गोडाऊनमधून भरून मार्केटमध्ये नेत असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांच्या तपासात हा तांदूळ सरकारी धान्य दुकानातील असल्याचं पुढे आलं. पोलिसांनी गोडाऊनवरसुद्धा जाऊन तपासणी केली. मात्र त्या ठिकाणी आणखी धान्य मिळून आलं नाही.

अशी होते काळाबाजारी

गरिबांना अन्न हवं म्हणून सरकार रेशनचं धान्य देते. पण, ते धान्य गरिबांना पूर्णपणे मिळत नाही. काही दुकानदार अर्धवट रेशनचं धान्य देऊन गरिबांची बोळवण करतात. याची तक्रार अन्न पुरवठाविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केल्यास तेही फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाही. रेशन दुकानदार बदलवून टाका असा सल्ला देतात. त्यामुळं रेशन दुकानदारांचे चांगलेच फावते. काही रेशन दुकानदार रेशनचे चांगले धान्य बाजारात व्यापाऱ्यांना विकतात. व्यापारी राईस मिलमध्ये माल पोहचवतात. राईस मिलमध्ये त्या तांदळाला बारीककरून पुन्हा बाजारात आणले जाते. असे हे चक्र नागपूर जिल्ह्यात सुरू आहे. या प्रकरणी चौकशी केल्यास मोठं घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.

चार हजार किलो तांदूळ बाजारात

अशाप्रकारे गरिबांच्या हक्काचे चार हजार किलो तांदूळ बाजारामध्ये विक्रीसाठी जाताना पकडण्यात पोलिसांना यश आलं. ४० क्विटल धान्य जप्त करण्यात आले. अशी माहिती कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी दिली. रेशन दुकानात येणाऱ्या धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर आळा घालण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. यातून सामान्य माणसाचा हक्क मारला जातो हे मात्र नक्की. अन्न पुरवठा विभागानं पोलिसांसोबत चौकशी केल्यास फार मोठं घबाड बाहेर येईल.