नागपूर : गिट्टीखदान पोलीस (Gittikhadan Police) हद्दीत मोठी दुर्घटना घडली. भरधाव स्कार्पिओ रस्त्यावरून अनियंत्रित (Scorpio accident) झाली. या गाडीने रस्त्याच्या बाजूला असलेली भिंत तोडली. ती भिंत घरातील आठ वर्षांच्या बालकावर पडली. यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. आयबीएम रोडवर एक भरधाव आलेली स्कार्पिओ रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्याशा घरामध्ये घुसली. स्कार्पिओ गाडीची धडक एवढी जोरदार होती की त्यामुळे भिंत कोसळली. घराच्या आत असलेला आठ वर्षाचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संपूर्ण भिंत त्याच्या अंगावर पडली होती.
गाडीमध्ये चार ते पाच जण होते. ते सुद्धा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. या परिसरात अगदी उताराचा असा हा रोड आहे. अरुंद रोड असल्याने आणि चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यामुळं हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मात्र या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. अशी माहिती गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबूराव ढेरे यांनी सांगितलं.
या अपघातात स्कार्पिओचा वरचा भाग पूर्णपणे चेपकला. टो लावून गाडीला हलविण्यात आले. या भागात रस्ते अतिशय अरुंद आहेत. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कार्पिओ थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवर गेली. ती भिंत बालकावर पडली. यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघात कसा झाला याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. बालकाचा नाहक बळी गेल्याबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत होते.