नवदाम्पत्य देवदर्शन करुन आलं, घरात लगीनघाई, जनरेटरच्या धुराने 6 जणांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय?

| Updated on: Jul 13, 2021 | 3:04 PM

या कुटुंबातील मुलाचे 28 जून रोजी लग्न झाले होते. नवे जोडपे काल रात्री देवदर्शनानंतर घरी पोहोचले होते. घरात आनंदी वातावरण होते. रात्री वीज गेल्यावर घरात या कुटूंबाने डिझेल जनरेटर संच लावला होता.

नवदाम्पत्य देवदर्शन करुन आलं, घरात लगीनघाई, जनरेटरच्या धुराने 6 जणांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय?
Lashkare Family died due to Generator fumes at Chandrapur
Follow us on

चंद्रपूर : वीज गेल्यामुळे घरात लावलेल्या जनरेटरच्या धुराने अख्खं कुटुंब संपवलंय. चंद्रपुरातील लष्करे कुटुंबावर काळाने घाला घातलाय. धक्कादायक म्हणजे घरात नुकतीच लगीनघाई होती. नवदाम्पत्य देवदर्शन करुन आलं होतं. मात्र नव्या संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांचा संसार कोलमडून पडलाय. चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात ही धक्कादायक घटना घडली. मजूर असलेल्या या एकाच कुटुंबातील 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याने पंचक्रोशी सैरभैर झाली आहे.  मृतांमध्ये अजय लष्करे आणि माधुरी लष्करे या नवदाम्पत्याचा समावेश आहे.

या कुटुंबातील मुलाचे 28 जून रोजी लग्न झाले होते. नवे जोडपे काल रात्री देवदर्शनानंतर घरी पोहोचले होते. घरात आनंदी वातावरण होते. रात्री वीज गेल्यावर घरात या कुटूंबाने डिझेल जनरेटर संच लावला होता. मात्र जनरेटरमधून धूर बाहेर येत होता. घरातच रात्रभर जनरेटर सुरु होता. त्यामुळे रात्रभर धुराचे लोळ घरातच घुटमळत होते. घर पॅक असल्यामुळे धूर बाहेर जायला वाव नव्हता. त्यामुळे झोपेत असलेल्या लष्करे कुटुंबांचा श्वास कधी गुदमरला हे कोणालाच कळलं नाही.

लगीनघरात 6 मृतदेह 

लगीन घरात काहीच हालचाल दिसत नसल्यामुळे सकाळी शेजारच्या लोकांना शंका आली. आधी त्यांनी दार ठोठावलं. त्यावेळी त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शंकेचं रुपांतर संशयात झालं आणि जे नको होतं तेच झालं. लष्करे कुटुंबातील 6 लोकांचे मृतदेह लगीनघरात पडले होते.

सर्व मयत आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात आणले गेले आहेत. रमेश लष्करे- 44, अजय लष्करे-20 लखन लष्करे 9, कृष्णा लष्करे आठ, माधुरी लष्करे 18, पूजा लष्करे 14 अशी मृतांची नावे आहेत. दासू लष्करे 40 हा एकमेव सदस्य बचावला आहे.

पोलिसांचा अंदाज काय? 

दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी या भागात धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मयत आणि एका अत्यवस्थ व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. घरात धूर भरून राहिल्याने गॅसच्या त्रासाने हे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

हे सर्व मृत्यू विषाने झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. पोस्टमार्टेमनंतर याचा खुलासा होणार आहे. घटना झालेले घर सर्व बाजूंनी बंद असून वर लोखंडी टिन आहेत. या घरातून धूर बाहेर जाण्यास कुठलाही मार्ग नाही. त्यामुळे डिझेल जनरेटरमधून उत्सर्जन होणाऱ्या धुराने हे मृत्यू ओढविल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

या दुर्दैवी घटनेचे आणखी काही पदर आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. माज्ञ जनरेटरच्या धुराबाबत काळजी न घेतल्याने ही मोठी घटना ओढविली आहे, हाच प्राथमिक अंदाज आहे.

संबंधित बातम्या  

जनरेटरच्या धुराने कुटुंब संपवलं, झोपेतच 6 जणांचा मृत्यू, विदर्भ हादरला