नागपूर : नागपूरच्या (Nagpur) सक्करदरा पोलिसांनी एका भलत्याच चोरट्या गॅंगचा पर्दाफाश केला आहे. ही गँग इको गाडीचे (eeco) सायलेन्सर चोरायचे आणि त्यातील प्लॅटिनम (platinum) काढून, त्याचा आकार बदलून ते भंगारात विकायचे. प्लॅटिनम काढून भंगारात विकून पैसे कमावणे हा त्यांचा ‘धंदा’ बनला होता. मात्र नागपूर पोलिसांनी या चोरट्यांचा पर्दाफाश केला आहे. एकाच दिवशी दोन सायलेन्सर चोरी गेल्याने, प्रकार उघडकीस आला. या टोळीने शहरातील इतर भागातसुद्धा असा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना आहे.
नागपुरात इको या चारचाकी गाडीचे सायलेन्सर चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. मात्र या तीन जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एकाच दिवशी सक्करदरा पोलीस स्टेशनहद्दीत 2 गाड्यांचे सायलेन्सर चोरी गेल्याच्या तक्रारी आल्याने पोलीस सतर्क झाले होते. पोलिसांनी आपली चक्रं फिरवायला सुरुवात केली आणि पोलिसांच्या हाती एक टोळी लागली. त्यांनी सायलेन्सर चोरीची कबुली दिली. पोलिसांना संशय आहे की शहरात यांनी अशाप्रकारे आणखी डल्ला मारला असणार.
चोरी जरी लहान वाटत असली आणि चोरीचा प्रकार नवीन असला, तरी मोठा आणि महागात जाणारा प्लॅटिनमचा त्यात समावेश असल्याने पोलिसांनी आता यांची पाळंमुळं खोदायला सुरुवात केली आहे.
नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गेल्या सलग दोन दिवसांमध्ये हत्येच्या दोन घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दारु पिण्याच्या वादातून चुलत भावानेच तरुणाची हत्या केल्याची घटना नागपुरात ताजी असताना दुसऱ्याच दिवशी वर्चस्व वादातून एकाची हत्या झाल्याचा प्रकार समोर येत आहे.
सलग दोन दिवस हत्येच्या घटना
धक्कादायक बाब म्हणजे शनिवारी रात्रीच यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची हत्या झाली होती. शनिवारी रात्री अजय भारती याची दारू पिण्याच्या वादातून चुलत भावाने हत्या केली होती. तर रविवारी रात्री आवेश पठाणची हत्या करण्यात आली.
अश्लील वर्तनाला कंटाळून युवकाची हत्या
दुसरीकडे, गॅरेजमधील सहकारी मित्राच्या अश्लील वर्तनाला कंटाळून युवकाने त्याची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात नागपुरात उघडकीस आली होती. डोक्यावर टॉमीने वार करुन तरुणाचा खून करण्यात आला. राजू नागेश्वर असे मृताचे नाव होते, तर देवांश वाघाडे असे आरोपीचे नाव आहे. अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याने तरुणाने सहकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप झाला होता.
संबंधित बातम्या
एकतर्फी प्रेमातून शिवीगाळ, पोलिसात तक्रार केल्याने चाकूहल्ला, 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू
नागपुरात तरुणाची गळा चिरून हत्या, यशोधरा नगरात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना