सुनील ढगे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : नागपूरच्या कळमना पोलिसांनी (Police) घरफोडी करणाऱ्या कुख्यात गॅंगचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून पाच मोठ्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिनेसुद्धा पोलिसांना हस्तगत करण्यात यश मिळालंय. या गॅंगमधील सदस्यांना मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) भंडाऱ्यातून (Bhandara) अटक करण्यात आली.
नागपूरच्या कळमना मार्केट परिसर आणि कळमना वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी या घरफोडीच्या गुन्ह्याकडे लक्ष केंद्रित केलं. एका आरोपीचा सुगावा लागला. त्याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली.
त्यानंतर त्याने जी माहिती दिली त्यावरून एक दोन नाही तर पाच घरपोडीचे गुन्हे उघडकीस आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या होत्या. या पोलिसांनी काही आरोपींना मध्यप्रदेश तर काहींना महाराष्ट्राच्या भंडाऱ्यामधून अटक केली.
आरोपींनी पाच घरफोडींची कबुली दिली. आरोपींकडून सोन्या-चांदीचे मोठ्या प्रमाणात दागिने हस्तगत करण्यात सुद्धा पोलिसांना यश आलं. अशी माहिती कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी दिली.
चोरट्यांनी मोठ्या शिताफीने या घरफोड्या केल्या. नागपुरातून पलायन केलं होतं. मात्र पोलिसांच्या नजरेतून ते वाचू शकले नाही. आता पोलिसांच्या बेड्या त्यांच्या हातात पडल्या आहेत. त्यामुळं आणखी कुठं यांनी अशाप्रकारे चोऱ्या केल्या का हेसुद्धा पुढे येणार आहे.