नागपूर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बंद घरात घुसून दोन चोरट्यांनी चोरी केल्याची घटना नागपूरमधील सोनगाव परिसरात उघडकीस आली आहे. घरातील सर्व जण बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम लंपास केली. मात्र चोरटे घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे सोनेगाव पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील बद्रीनाथ सोसायटी पराते लेआउट या ठिकाणी विनायक भारती यांचं घर आहे. विनायक भारती आपल्या कुटुंबासह तीन दिवसासाठी पुण्याला मुलाकडे गेले होते.
याच काळामध्ये चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्यांच्या घरात घुसून चोरी केली. भारती हे पुण्याहून परत आले असता त्यांना घराचं दार उघडं दिसलं. यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल घेत पंचनामा केला असता सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम घरातून चोरी झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी घराच्या बाहेरील सीसीटीव्ही तपासले असता दोन चोरटे मोटरसायकलवरून जाताना दिसून येत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आता या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
पोलिस किंवा सीआयडीच्या अधिकारी असल्याची बतावणी करत लोकांजवळील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू त्यांच्या नजरेआड चोरून नेल्याच्या अशा दोन घटना घडल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथे या घटना घडल्या आहे. या दोन्ही घटनांत दोन लाखांवरील ऐवज चोरून नेण्यात आला आहे.