नागपूर : एटीएमचा पिन जनरेट करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत एटीएम कार्ड बदलून रक्कम लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याने आतापर्यंत अशाप्रकारे दहा जणांना गंडवल्याचं उघडकीस आलं आहे. पोलीस आता ही गॅंग आहे का? याचा शोध घेत आहेत. सामान्य किंवा मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत हा लुटारु त्यांचे मेहनतीचे पैसे लुटून पसार व्हायचा.
नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीत एक व्यक्ती बँकेचे खाते उघडून आपल्या एटीएमचा पिन जनरेट करण्याकरता गेला. मात्र त्याला तो करता आला नाही. म्हणून त्याने एकाची मदत घेतली. पण ज्याची मदत घेतली तो याच गोष्टीची वाट पाहत होता.
सदर इसमाने त्याचा पिन जनरेट करताना कार्ड बदललं आणि अवघ्या काही वेळातच त्याच्या खात्यातून चाळीस हजार रुपये काढून घेतले. फिर्यादीच्या ही बाब लक्षात येताच त्याने तात्काळ कपिल नगर पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली.
कपिल नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करत तपास सुरु केला. आरोपी एटीएममधील सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीची तपासणी केली असता त्याच्या खिशातून 15 ते 16 एटीएम कार्ड निघाले. याने चक्क सामान्य माणसाला लुटण्याचा व्यवसाय सुरू केला होता. आतापर्यंत त्याने दहा जणांना असे ठगल्याची कबुली दिली. त्याच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या एटीएम धारकांना बोलावलं असून, त्याने कोणाची किती लूट केली याचा शोध घेत आहेत. सोबतच हे सगळं काम हा एकटाच करतो की गॅंग आहे याचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत.