नागपूर / 18 ऑगस्ट 2023 : नागपूर पोलिसांनी ड्रग विरोधात मोहीम सुरु केली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया सुद्धा होताना दिसत आहे. नागपूरच्या ताजबागमध्ये ताजुद्दिन बाबाच्या उर्फ दरम्यान विकण्यासाठी आणण्यात आलेले एमडी ड्रग्स पोलिसांनी पकडण्यात यश मिळविले. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. नागपूरचा ताजबाग परिसर काही वर्षांपूर्वी एक प्रकारे ड्रगचा अड्डा बनलेला होता. मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी वारंवार ऑपरेशन राबवत तिथल्या ड्रग विक्रेत्यांची कंबरडे मोडलं. मात्र अजूनही या ठिकाणी काही गुन्हेगार काम करत असल्याच या कारवाईनंतर दिसून आलं.
नागपूर शहरात पोलिसांनी ऑपरेशन नार्को राबवलं आणि त्यात अनेकांना अटक करून जेलमध्ये सुद्धा टाकलं. मात्र तरीही नागपूरमध्ये ड्रगची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. नागपुरात ताजुद्दिन बाबाचा उर्फ सुरू आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. त्या ठिकाणी विकण्याच्या उद्देशाने एमडी ड्रग आणण्यात आलं होतं. मात्र या संदर्भातली गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा पोलीस आणि नंदनवन पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. तीन आरोपींना अटक करत आरोपींकडून 12.12 ग्राम ड्रग हस्तगत करण्यात आलं आहे. पोलिसांनी आधीच आवाहन केले आहे की, ड्रग विकणाऱ्यांची किंवा घेणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई करत हे ड्रग तर जप्त केलं आहे. सोबत तीन आरोपींना सुद्धा अटक करून आता त्यांची जाळं शोधण्याचं काम सुरू केलं असल्याचं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.