नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाणे हद्दीतील बडेगावच्या जंगलातील खेकरानाला परिसरात काल (22 सप्टेंबर) एका इसमाचा मृतदेह आढळला होता. या मृतकाच्या खिशात असलेल्या ओळखपत्राच्या आधारावर मृतक व्यक्तीची माहिती समोर आली होती. प्रदीप जनार्धन बागडे असे मृताकाचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृतकाची चार ते पाच दिवसांपूर्वी हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला होता. विशेष म्हणजे याच हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मृतक प्रदीप बागडे याच्या पत्नीनेच त्याच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे.
मृतक प्रदीप बागडे हा चार पाच दिवसांपूर्वी बाहेर जातो म्हणून सांगून गेला. मात्र तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार अजनी पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र चार दिवसांनंतर बडेगावच्या जंगलात खेकडा नाला परिसरात एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या खिशात मिळालेल्या ओळखपत्राच्या आधारे मृतक व्यक्ती प्रदीप बागडे असल्याचं स्पष्ट झालं.
अज्ञात आरोपींनी प्रदीप बागडेचा मृतदेह महारकुंड शिवारातील पुलाखाली असलेल्या सिमेंटच्या पायलीमध्ये लपवला होता. प्रदीपचा खून इतरत्र कुठे केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह सीमेंटच्या पायलीमध्ये ठेवला होता. मात्र जंगलातील प्राण्यांनी तो मृतदेह बाहेर ओढल्याने ही घटना उघडकी आली.
घटनास्थळावरील पुरावे बघता प्रदीपचा खून चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असल्याचा संशय पोलिसांना आला. हत्या अन्य ठिकाणी केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह बडेगावच्या जंगलात फेकला असावा, असा अंदाज पोलिसांनी लावला. त्यानंतर पोलिसांनी सविस्तर तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पवन चौधरी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपण मृतकाची पत्नी सीमा बागडे हिच्या सांगण्यावरुन हत्या करुन मृतदेह जंगलात फेकल्याच सांगितलं. मृतक हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिने 3 लाख रुपयांत सुपारी दिली. त्यापैकी 50 हजार रुपये हत्येच्या आधी दिले होते, असा कबुली जबाब त्यांनी दिला. त्यानंतप पोलिसांनी मृतकाची पत्नीला देखील अटक केली.
मृतक हा छोटा चायनीजचा ठेला चालवायचा. त्यातच तो वाहन-सर्व्हिसिंगचे काम सुद्धा करायचा. त्यातूनच त्याची हत्या करणाऱ्या आरोपींसोबत ओळख होती. मात्र त्यांनी आणि पत्नीने त्याचा घात केला. त्यामुळे आता माणसाने विश्वास नेमका कुणावर ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
मस्त पाऊस ! जंगलात पर्यटनासाठी नागपूरकर गेले, पण पुलाखाली मृतदेह, एकच खळबळ