नागपूर : नागपुरातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतात. या घटना पाहता शिवसेनेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. युवा सेनेच्या कोणत्याही पाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असेल किंवा त्याचा रेकॉर्ड खराब असेल तर त्याच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असं युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई म्हणाले आहेत. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. युवा सेनेत आता स्थानिक पातळीवर बलद होणार आहे. त्यामुळे आता चांगल्या कामांनाच प्राधान्य दिलं जाईल, असंही वरुण सरदेसाई म्हणाले.
वरुण सरदेसाई यांचा विदर्भातील युवा संवाद दौरा आजपासून सुरू झाला आहे. यासोबतच युवा सेनेची प्रभाग निहाय बांधणी व्हावी यासाठी युवा सेनेचा विस्तार आणि बांधणी करण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सुद्धा युवा सेनेला मोठं काम करायचं आहे, असं सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
“कोरोना काळात संवाद होत नव्हता. त्यामुळे काही पदाधिकारी नाराज आहेत, असं वाटत होतं. मात्र आता कोरोना कमी झालाय. आता संवाद सुरू झाला आहे. त्यामुळे आता सगळी नाराजी दूर होईल. निवडणुका कशा लढवायच्या? एकटे की युती हा निर्णय पक्ष प्रमुख घेतात. आम्ही सगळी तयारी सुरू केलीय”, अशी देखील प्रतिक्रिया वरुण सरदेसाई यांनी दिली. दरम्यान, वरुण सरदेसाई यांचा विदर्भात युवा सेना बळकट करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार असला तरी पक्षाला अंतर्गत विरोध कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत.
यावेळी वरुण सरदेसाई यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांना मनसे विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष कुणाला करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मनसे विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष कोणाला करायचं हे त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असं उत्तर दिलं. तसेच विदर्भात किंवा कुठेही कुणाला कोणती जबाबदारी द्यायची, मंत्री कोण होणार हे पक्ष ठरवतो. त्यावर मला बोलता येणार नाही, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा :
…तर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, खबरदारीसाठी नागपुरातील 850 सराफांना नोटीस