सुनील ढगे टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 11 ऑक्टोबर 2023 : नागपूरमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. महिलाविरोधातील गुन्ह्यांमध्येही (crime in nagpur) बरीच वाढ होत असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी गुन्हेगाराना आळा घालण्यासाठी कठोर प्रयत्न करूनही काही मोकाट सुटले आहेत. अशाच एक सराईत गुन्हेगाराला (accused arrested) पोलिसांनी अटक केली आहे.
अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात धंतोली पोलिसांना यश आलं आहे. अल्पवयीन मुलींची छेड काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून एका केस मध्ये त्याला शिक्षा सुद्ध सुनावण्यात आली. मात्र तरीही तो सुधारला नाही. पोलिसांनी पुन्हा त्याच्या मुसक्या आवळत अटक केली आहे.
कुरिअरवाला बनून आला आणि नको ते उद्योग…
शैलेश भुजराज यादव असे विकृत आरोपीचे नाव असून त्याने पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचे समोर आल्यानतंर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी शैलेश हा नागपूरच्या धंतोली परिसरात एका इमारतीत उभा होता. तेवढ्यात शाळेतून परत येणारी एक अल्पवयीन मुलगी इमारतीत शिरल्यावर त्याला दिसली. कुरिअरवाला असल्याचे सांगसोबत त त्याने त्या अल्पवयीन मुलीला हाक मारली. मात्र ती मुलगी जवळ आल्यावर त्याने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला.
याप्रकारामुळे भेदरलेल्या त्या मुलीने जोरात आरडाओरडा करत मदत मागण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी तेथून फरार झाला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये त्यांना आरोपी गाडीवरून आलेला दिसला, त्याच्या गाडीच्या नंबर वरून त्याचा शोध घेतला. आरोपी हा एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात एसी तसेच लॅपटॉप दुरुस्तीचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला अटक करत त्याची संपूर्ण पार्श्वभूमी शोधली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. आत्तापर्यंत त्याने अनेक अल्पवयीन मुलींची छेड काढली असून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे. एका प्रकरणात त्याला शिक्षासुद्धा सुनावण्यात आली होती, मात्र तरीही त्याने त्याचं विकृत कृत्य सुरूच असल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करत त्याला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.