नागपूर / सुनील ढगे : नागपुरात अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या स्वयंघोषित सोशल मीडिया तज्ज्ञ अजित पारसे याला अखेर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे अजित पारसे विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याच्या 6 महिन्यानंतर पारसे याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने अजित पारसेचा अटकपूर्व जामीन नुकताच फेटाळला होता, त्यानंतर पोलिसांनी पारसेला अटक केली. नागपुरातील डॉ. राजेश मुरकुटे यांना निधी मिळवून देण्याचे आश्वासन देत पारसे याने करोडोचा चुना लावला होता. याप्रकरणी पारसे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नागपूरचे डॉ. राजेश मुरकुटे यांना होमिओपॅथी महाविद्यालय काढण्यासाठी सीएसआर निधी मिळवून देण्याचे पारसे याने आश्वासन दिले होते. थेट पीएमओमध्ये ओळख असल्याचे सांगत डॉक्टर मुरकुटे यांना अजित पारसेने तब्बल साडेचार कोटी रुपयांचा गंडा घातला. डॉ. मुरकुटे यांनी पैसे परत मागितले असता, त्याने कधी इन्कम टॅक्स तर कधी सीबीआय चौकशीची धमकी दिली. तर कधी हायप्रोफाईल व्यक्तींच्या नावे धमकी द्यायचा.
यानंतर डॉ. मुरकुटे यांच्या तक्रारीनंतर 22 ऑक्टोबर 2022 मध्ये अजित पारसे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात बनावट लेटरहेड, स्टॅम्प पेपर, पोलिसांचे रबर स्टॅम्प जप्त करण्यात आले होते. अटक टाळण्यासाठी पारसे रुग्णालयात दाखल झाला होता. तसेच त्याने आत्महत्या करण्याचे नाटक देखील केले होते.
पारसे याने शहरातील अनेकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. मात्र बदनामीच्या भीतीपोटी तक्रारदार समोर आले नाहीत. पारसे विरुद्ध आतापर्यंत दोघांनीच फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी समोर यावे असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर पारसेला 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.