नागपूर / सुनील ढगे : नागपुरात नकली सोने देऊन खरे सोने नेणाऱ्या महिलांची गँग सक्रिय झाली आहे. या गँगमध्ये तीन महिलांचा समावेश असून, तिघीही उत्तर प्रदेशातील आहेत. पॉलिश केलेलं सोनं देऊन त्या बदल्यात ओरिजनल सोन्याचं दागिने घेत सराफांची फसवणूक करुन फरार व्हायच्या. याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील एका महिलेला अटक करण्यात पाचपवली पोलिसांना यश आलं आहे. अन्य दोन फरार महिलांचा शोध पोलीस घेत आहेत. अनुराधा रमेश सिंग असं अटक महिलेचं नाव असून ती वाराणसी येथील रहिवासी आहे.
नागपूरच्या कमाल चौकात आसरे ज्वेलर्सकडे तीन महिलांनी येऊन 25 ग्रॅम सोन्याच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू घेऊन गेल्या. त्या दागिन्यांना उच्च कोटीचं पॉलिश केलं असल्याने ते नकली असल्याचे लगेच सराफाच्या लक्षात आलं नाही. मात्र फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, ज्वेलर्सने त्या महिलेचा सीसीटीव्हीमधील फोटो ज्वेलर्सच्या ग्रुपवर टाकून माहिती दिली. यानंतर अन्य सराफांनाही या महिलांनी अशाच प्रकारे फसवल्याचं निष्पन्न आलं.
दुसऱ्या दिवशी त्यातील एक महिला दुकानात आली. दुकानदाराच्या हे लक्षात येताच त्या महिलेने तेथून पळ काढला. यानंतर सराफाने पाचपावली पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत एका महिलेला अटक केली. अन्य दोन महिलांचा शोध सुरू आहे. यात वाराणसीचं एखादं रॅकेट असल्याचा संशय असून, पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.