सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,नागपूर | 27 ऑक्टोबर 2023 : नागपूर शहर सध्या गुन्ह्यांमुळे गाजतंय. कुठे सलूनच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय होतोय तर कुठे चोरीची घटना घडत आहे. गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे (crime in nagpur) नागपूरवासीय अगदी त्रस्त झाले असून वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसही कंबर कसून प्रयत्न करत आहेत. पोलिसांची गस्त, बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
मात्र तरीही गुन्हे काही कमी होताना दिसत नाहीत. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या चोरांपासून, गुन्हेगारांपासून सामान्य लोकांना वाचवण्याचं काम पोलिस करतात, जनतेच रक्षण करतात. त्याच पोलिसांनाही चोरट्यांचा फटका बसला आहे. जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीच चोरट्याने डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. घरात कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपीने घरफोडी करत 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला. यामुळे एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलीस ड्युटीवर, तर कुटूंबीय घराबाहेर.. तेव्हाच घडली चोरी
जनतेचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज, तत्पर असणाऱ्या पोलिसांच्याच घरात चोरीची ही घटना घडल्याने सर्वत्र चर्चा सुरू आहे. नवी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यशोधरानगर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याच्याचा बंद घरात चोरट्याने अवैधरित्या प्रवेश केला. आणि सोन्या-चांदीचे दागिने व इतर माल मिळून जवळपास ५ लाखांचा माल पळवला.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी लक्ष्मीकांत बारलिंगे यांच्या घरात लुटीचा हा प्रकार घडला. २४ तारखेला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बारलिंगे हे ड्युटीवर होते. तर त्यांच्या घरातील इतर सदस्य घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घरात कोणीही नसल्याचे हेरून, हीच संधी साधून अज्ञात आरोपीने बारलिंगे यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप, कडी तोडून अवैधरित्या प्रवेश केला.
त्यानंतर त्याने घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडले आणि लॉकरमध्ये असलेली 65 हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिवे आणि एटीएम कार्ड असा एकूण 5 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरला. त्यामध्ये सोन्याचे दागिनेच जवळजवळ नऊ-साडेनऊ तोळ्याचे होते. असा सर्व मुद्देमाल चोरून तो चोरटा फरार झाला. याप्रकरणी बारलिंगे यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या घरीच जर चोरी करण्याचं धाडस चोर करत असेल तर त्यांची हिम्मत किती वाढली असेल, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.