नांदेड : नांदेडमध्ये सध्या चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं दिसतंय. शहरातील गजबजलेल्या मालेगाव रोडवरचे चक्क एटीएम मशीन चोरट्यानी पळवलंय. पळवलेल्या एटीएम मशीनमध्ये 25 लाख 89 हजाराहून अधिकची रक्कम होती. स्टेट बँकेचे असलेले हे एटीएम सेंटर फोडून चोरट्यानी मशीनचा रोकड ठेवलेला भाग पळवलाय. रात्री दोन ते तीन वाजल्याच्या दरम्यान चार चोरट्यानी जीपचा वापर करत ही चोरी केल्याचे कळतंय. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर आता घटनास्थळी श्वान पथकासह पोलीस फौज दाखल झाली. मात्र चोरट्यांचा अद्याप सुगावा लागलेला नाही. या चोरीचा तपास लावण्यासाठी तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झालेत. मात्र अगदी मुख्य रस्त्यावर आणि गजबजलेल्या वस्तीतील एटीएम फोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.
भाग्यनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील रात्रीची गस्त बंद आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचं बोललं जातंय. आता या चोरीचा छडा लावण्याचं मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. नांदेडला सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक नव्याने रुजू झालेत, या दोघांनी घटनास्थळी भेट दिलीय. तर या चोरीचा तपास लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हा शाखेला दिल्याचे समजतंय.
नांदेड शहरातील सर्वात मोठे पोलीस ठाणे म्हणून भाग्यनगर पोलीस ठाण्याची ओळख आहे. मात्र आता मटका जुगाऱ्याचा अड्डा म्हणून या पोलीस ठाण्याची ओळख बनल्याची चर्चा रंगलीय. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मालेगाव आणि पूर्णा या मुख्य रस्त्यावर खुलेआम पणे मटका जुगार सुरू आहे. या अवैध धंद्याना अभय मिळत असल्याने भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठया प्रमाणात बोकाळलीय.
दरम्यान, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारातून मोठया प्रमाणात नागरिकांच्या मोबाईल आणि किंमती वस्तूंची चोरी होत असते. त्यासोबतच गेल्या काही महिन्यात दुचाकी चोरीचे प्रमाण देखील याच हद्दीत वाढलंय.
मात्र या चोरीच्या तक्रारी दाखल करून घेण्यास पोलीस मज्जाव करतात, जेणेकरून गुन्ह्याचे प्रकरण वाढू नयेत अशी काळजी घेतल्या जाते, असाही आरोप केला जातो. आता तर चोरट्यानी एटीएम मशीनच पळवल्याने गंभीर प्रश्न पोलिसांवरच उपस्थित केला जातोय.