नांदेड : नांदेड (Nanded Crime News) जिल्ह्यातून एक क्रूर घटना समोर आली आहे. आईनेच्या पोटच्या मुलांची हत्या (Nanded Murder) केली. मुलांचे मृतदेह जाळून पुरावा नष्टही करण्याचा प्रयत्न केला. या महिलेनं आपल्या आई आणि भावाच्या मदतीनं हे हत्याकांड केलंय. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरुन गेला आहे. नांदेडमध्ये चार महिन्याच्या निष्पाप मुलीसह एका दोन वर्षांच्या मुलाचीही निर्दयी आईनं हत्या (Mother killed son and daughter) केली. या क्रूर हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकूण तिघांना अटकही केली आहे. आता त्यांची कसून चौकशी केली जाते आहे. त्यांनी हे क्रूर कृत्य का केलं, याचा आता नांदेड पोलिसांकडून शोध घेतला जातोय. संध्याकाळच्या वेळेत कुणी नाही हे पाहून या महिलेनं आपल्याच मुलांचा जीव घेत त्यांचे मृतदेह जाळले होते.
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातील पांडुरणा इथं ही घटना घडली. निर्दयी आईने दोन चिमुकल्यांची हत्या केली. त्यानंतर आपल्याच आई आणि भावाच्या मदतीने पुरावाही नष्ट केला. या प्रकरणी भोकर पोलिसात आज पहाटे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरणा गावात राहणाऱ्या 30 वर्षीय धुरपताबाई गणपत निमलवाड असं प्रमुख आरोपीचे नाव आहे. आरोपी महिला पांडुरणा येथे शेत शिवारात आखाड्यावर पती आणि दोन वर्षीय मुलगा आणि अवघ्या 4 महिन्याच्या मुलीसह रहात होती. तर सासू-सासरे अन्य दुसऱ्या शेतात वास्तव्यास होते. दरम्यान आरोपी धुरपताबाई निमलवाड हिने 31 मे ते 1 जूनच्या दरम्यान, सायंकाळी ६ वाजण्याच्या वेळेत कुणी नाही हे पाहून मुलगा दत्ता गणपत निमलवाड (वय 2 वर्षे) आणि मुलगी अनुसया गणपत निमलवाड (वय 4 महिने) या दोघांची पांडुरणा शिवारात हत्या केली.
त्यानंतर आरोपी धुरपताबाईने आपली आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड आणि भाऊ माधव पांडुरंग राजेमोड (दोघे रा. ब्राम्हणवाडा ता.मुदखेड) यांच्या मदतीने दोन्ही मयत लेकरांचे प्रेत जाळून पुरावा नष्ट केला. आरोपी आईने असे कृत्य का केले हे समजू शकलेलं नाही. आरोपी महिला मनोरुग्ण असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याबाबत गावातील गोविंद दगडुजी निमलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धुरपताबाई गणपत निमलवाड, कोंडाबाई पांडुरंग राजेमोड, माधव पांडुरंग राजेमोड, अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही अटक करण्यात आली असून पोलिस उप निरीक्षक दिगंबर पाटील पुढील तपास करीत आहेत.