नांदेड : मामाने लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिला, म्हणून भाच्याने मामाचीच हत्या केली. नांदेड जिल्ह्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे (Nanded Murder) एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी भाच्यास पोलिसांनी (Nanded crime News) अटक केली आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणी पुढील कारवाई केली जातेय. भाचा काहीही काम करत नाही, म्हणून मामाने आपली मुलगी देण्यास त्याला नकार दिला होता. ‘हुंडा नको, पण लग्नासाठी मुलगी दे’, अशी मागणी घालत भाचा मामाजवळ आला होता. पण मामाने (Nephew killed uncle) मुलगी देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भाच्याने टोकाचं पाऊल उचललं.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये ही खळबळजनक घटना घडली. अर्धापूर तालुक्यातील चाभरा इथं 9 सप्टेंबर रोजी रात्री घराबाहेर बालाजी दिगंबर काकडे हे झोपले होते. त्यावेळी त्यांच्यावर एकाने कुऱ्हाडीने वार करत हल्ला केला.
गंभीर जखमी झालेल्या बालाजी काकडे याची निर्घृण हत्या करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यात आला. त्यानंतर पुढील तपासाला पोलिसांनी सुरुवात केली होती. अखेर पोलिसांनी पाच दिवसांच्या आतच या हत्येचा छडा लावला आहे. या हत्याकांडप्रकरणाचं गूढ उकलण्यातही पोलिसांना यश आलंय.
पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा सुगावा लागला होता. त्यानुसार पोलिसांनी हत्या करण्यात आलेल्या बालाजी काकडे यांचा भाचा एकनाथ बंडू जाधव याला अटक केली होती. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर एकनाथ जाधव याने गुन्हा कबूल देखील केलाय. हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं वय अवघं 19 वर्ष आहे.
एकनाथ जाधव याने मामाकडे मुलीचा हात मागितला होता. पण एकनाथ काहीच काम करत नसल्याने मामाने मुलगी देण्यास नकार दिला होता. याचा राग मनात ठेवून एकनाथ याने मामा बालाजी यांचा खून केला. हत्या केल्याच्या 50 तासांत पोलिसांनी आरोपी एकनाथ याला बेड्या ठोकल्या होत्या. आता त्याने हत्येची कबुलीही दिली आहे. पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या हत्याकांड प्रकरणाचा छडा लावला.